CSMTतील चहावाला महिन्याला कमवायचा दीड लाख, चौकशी करताच मोठा घोटाळा उघड, अधिकाऱ्यांना चहा पाजायचा अन्...
रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांना एकतर खूप वेळ वाट पाहावी लागते किंवा एखाद्या एजंटकडून कन्फर्म तिकीट घ्यावे लागते. त्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. मात्र अलीकडेच कन्फर्म तिकीट घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एका चहावाल्याने लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या चहावाल्याचा कारनामा उघड केला असून त्याला ताब्यात घेतलंय.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चहावाल्याचं दुकान होतं. चहावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा पुरवायचा. त्यांच्याशी त्याने ओळख वाढवली. त्यानंतर त्याने याच अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करुन व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करून दिली. रविंद्र कुमार साहू असं या चहावाल्याने नाव आहे. या कन्फर्म तिकीट घोटाळ्यातून त्याने महिन्याला तब्बल दीड ते दोन लाख रुपयांची कमाई केली आहे. तिकीटविक्रीतून इतकी कमाई केल्याचे पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. या प्रकरणी दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी चहावाल्याला ताब्यात घेतलंय.
रेल्वेची तिकीटं मिळत नसल्याची तक्रार प्रवासी नेहमीच करतात. अशावेळी लोक तिकीट मिळवण्यासाठी एंजटची मदत घेतात. तर काही जण तिकीट मिळावं म्हणून प्रवासी मिळेल तिथून आणि जास्त पैसे मोजून तिकीट खरेदी करतात. याचाच फायदा चहावाल्याने घेतला. साहू हा सीएसएमटी रेल्वे कँटिनमध्ये कार्यरत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचं काम तो करायचा. त्याने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता अशा पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे बनावट सही-शिक्का तयार करून घेतले. वेटिंग लिस्टला असलेल्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म करण्यासाठी लेटर तयार करून तो त्यावर अधिकाऱ्यांच्या बनावट सही-शिक्क्यांचा वापर करायचा. त्या आधारे तो तिकीट कन्फर्म करुन घ्यायचा.
रेल्वेच्या सुरक्षा दलाना साहूविरोधात कारवाई सुरू केलीय. त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून रेल्वेची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर दाखल केलाय. मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता निरीक्षक आणि त्यांचे पथक रेल्वेतील प्रवाशांची तिकीटं तपासत होते. त्यावेळी काही प्रवाशांनी जास्त पैसे देऊन कन्फर्म तिकीट घेतलंय असं सांगितलं. जेव्हा अधिक चौकशी केली तेव्हा रेल्वे कँटिनचा कामगारच व्हीआयपी कोट्यातून तिकीटं विक्रीचा कारभार करत होता असं उघडकीस आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.