राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या जामीन अर्जावर
कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात आज (दि.१) सुनावणी झाली. पोलिसांनी
जामीन अर्जावर आपले लेखी म्हणणं मांडताना जामीन देऊ नये, अशी मागणी केली.
यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोरटकरचा
जामीन अर्ज फेटाळून लावला.
कोरटकरचे वकील सौरभ घाग यांच्याकडून युक्तिवाद
जी पोस्ट इंद्रजित सावंत यांनी सोशल मीडियावर केली होती, ती चिथावणी देणारी आहे. कोरटकर यांनी स्वतः पोलिसांत तक्रार दिली होती की, माझा मोबाईल हॅक केला असून मी इंद्रजित सावंत यांना ओळखत नाही. इंद्रजित सावंत यांनी पहिला सोशल मीडियावर पोस्ट केली आणि नंतर पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास केला आहे आणि पुरावे गोळा केले आहेत, कोरटकर पोलिसांना सहकार्य करत आहेत. त्यामुळे त्यांना जमीन द्यावा.
शिवरायांच्या राजमुद्रेचा उल्लेख करत सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांचा युक्तिवाद
सीडीआर काढण्यात आला असून आरोपी यानेच कॉल केला होता, हे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. कॉल रेकॉर्डमध्ये सुद्धा आपण पाहिले, तर आक्षेपार्ह बोलून धमकी देण्यात आली आहे.
तांत्रिक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
मोबाईल हॅक करून कोणीतरी कॉल केला हा कोरटकरचा दावा खोटा आहे. जो राजा लोककल्याण आणि प्रजेसाठी लढला. त्यांचे अनेक मावळे त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकतील असे होते. त्या राजांबद्दल बोलून भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले आहे. अमेरिकेतील एका लेखकाचा ते रेफरन्स देत आहेत. या प्रकारच्या गुन्ह्यात 3 वर्षांची शिक्षा जरी असली तर त्यातून दंगल होण्याची शक्यता आहे. आणि निरपराध लोक याचे शिकार होण्याची आणि त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आरोपीचा असा काही हेतू आहे का? याबाबत तपास गरजेचा आहे.
शिवाय आरोपी याला काहींनी मदत केली, ज्याची नावे त्याने स्वतःच दिली आहेत. याचा पोलीस आता तपास करत आहेत. जामीन दिला, तर कोरटकर फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत जमीन मिळू नये.
न्यायालय परिसरासह प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा फौजफाटा
कोरटकरला न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला होता. त्याला कळंबा जेलमध्ये हलविले असून, सुरक्षिततेच्या द़ृष्टीने अंडासेलमध्ये त्यास ठेवले आहे. कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी तत्काळ जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. कोरटकरवर यापूर्वी न्यायालय आवारात दोनवेळा संतप्त जमावाकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय घेतला आहे. कोरटकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी होत असल्याने पोलिस यंत्रणेने कमालीची खबरदारी घेतली होती. सकाळपासून न्यायालय परिसरासह प्रवेशद्वारावर पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.