दिल्ली पोलिसांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक केली आहे. दिल्लीती साकेत जिल्हा न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटनंतर पोलिसांनी 48 तासांत पाटकर यांना अटक केली. पाटकर यांच्याविरोधात कोर्टाने एका 25
वर्षांपूर्वीच्या मानहानीच्या प्रकरणात दंड ठोठावला होता. पण दंड न
भरल्याने कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. पाटकर या कोर्टात
हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
दिल्लीची नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी पाटकर यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मागील वर्षी सत्र न्यायालयाने पाटकर यांना दोषी ठरवत तीन महिन्यांची कैद आणि 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली होती. पण अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी पाटकर यांच्या वयाचा विचार करून कैदेतून त्यांना सूट देत भरपाईचा आदेश कायम ठेवला होता.
पाटकर या कोर्टाच्या आदेशातील अटींचे पालन करण्यात असमर्थ ठरल्या तर त्यांच्या शिक्षेचा पुनर्विचार केला जाईल, असे कोर्टाने काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केले होते. त्यानंतर बुधवारी मेधा पाटकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा दाखला देत सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी अमान्य केली.कोर्टाने पाटकर यांना 23 एप्रिल रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. पण पाटकर या हजर न झाल्याने कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्या जाणीवपूर्वक कोर्टाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे दिसते. त्यांना बळाचा वापर करून न्यायालयात आणण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने वॉरंटचे आदेश दिले होते.मेधा पाटकर यांना आज कोर्टात हजर केले जाणार आहे. कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्याबाबत त्यांना विचारणा केली जाईल. पण त्या असमर्थ ठरल्यास कोर्टाकडून शिक्षेत बदल केला जाऊ शकतो. पूर्वी दिलेल्या कैदेची शिक्षाच कायम ठेवली जाऊ शकते. त्यामुळे पाटकर यांच्या शिक्षेवर आज सत्र न्यायालयात अंतिम सुनावणीनंतर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.