पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणामुळं एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे वेळेत उपचारांअभावी मृत्यू झालेली महिला ही भाजप आमदाराच्या पीएची पत्नी होती.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचार सुरु करण्यासाठी फोन येऊन देखील रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यानं मोठा संताप व्यक्त केला जात आहे. आज एका धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेमुळे मी अत्यंत व्यथित आहे. माझे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी सौ. मोनाली सुशांत भिसे यांना प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या गर्भात दोन जुळी बाळं होती.
रुग्णालयाने त्वरित १० लाख रुपये…
नेमकं काय घडलं?
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीबाबत हा प्रकार घडला आहे. प्रसूतीचा त्रास होत असल्यानं मोनाली ऊर्फ तनिषा सुशांत भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करण्यात आलं होतं. मात्र, उपचारांसाठी हॉस्पिटल प्रशासनानं त्यांना १० लाख रुपये खर्च सांगितला. सुरुवातीला 3 लाख रुपये भरायची तयारी नातेवाईकांनी दाखवल्यानंतरही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही.
तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला फोनही केला. पण तरीही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना अतिरक्तस्राव होऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा दावा भाजप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. याप्रकरणाची तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं केली आहे.
जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू
दरम्यान, तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला पण प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढल्यानं आईचा मृत्यू झाला. त्यामुळं दोन जिवांना जीवदान देत आईचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनावर संताप व्यक्त होत आहे.
वेळेत उपचार मिळाले असते तर....
दरम्यान, मृत्यू पावलेल्या मोनाली भिसे यांची नणंद प्रियांका पाटे यांनी सांगितलं की, "तनिषा भिसे माझी वहिनी लागते. २८ तारखेला रक्तस्त्राव होत असल्यानं तिला दीनानाथमध्ये नेलं होतं. त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, तुम्हाला २० लाख रुपये भरावे लागतील, तुमची ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जा, असा सल्लाही देण्यात आला. याच काळात वहिनीचा बी पी वाढला आणि त्यांना खूप टेन्शन आलं. यावेळी रुग्णाला ओपीडीमध्ये शिफ्ट केलं, २ तास रुग्ण तिथेच होता.या काळात एकही डॉक्टर रुग्णाला बघायला तिथं आला नाही. उलट नंतर प्रशासनानं आम्हाला पूर्ण १० लाख रुपये भरा, त्याशिवाय पेपर करणार नाही असं सांगितलं. मीनाक्षी गोसावी या तिथल्या डॉक्टर म्हणाल्या, ५ लाख रुपये भरा तेव्हा उपचार होतील. डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी स्वतः सांगितलं की, १० लाख रुपये भरा. आम्ही ३ लाख रुपये भरायला तयार होतो, या सगळ्या गोंधळात २ ते ३ तास लागले. वेळेत उपचार झाले असते तर आमची वाहिनी वाचली असती. या प्रकाराला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास आणि बिलिंग डिपार्टमेंटमधील मॅडम जबाबदार आहेत"
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.