औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठी दंगल उसळली होती. मोठी दगडफोक आणि गाड्यांची जाळपोळ करण्यात आली होती. या परिसरात स्फोटक परिस्थिती असताना आणि काही तरी घडणार असल्याची कल्पना असतानाही पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नसल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पोलिसांची बाजू घेतली
होती. फडणवीसांनी जरी पोलिसांची बाजू घेतली असली तरी मध्य नागपूरचे आमदार
प्रवीण दटके व भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांना दोषी ठरवले होते.
यातही तहसील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग यांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यंचा सर्वाधिक रोष होता. अशातच संजय सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिंग यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. याची किंमत त्यांना चुकवावी लागल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. याची प्रतिक्रिया शहरात उमटली. एका जमावाने मोठा राडा केला. तुफान दगडफेक केली. महाल परिसरात गाड्यांची जाळपोळ केली. पोलिसांवरसुद्धा दगडफेक करण्यात आल्याने परिस्थिती चिघळली होती. त्यामुळे शहरात कर्फ्यु लावावा लागला होता. सुमारे 1200 लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मुख्य आरोप फहीम खान याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. बुलडोजर चालवून त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे.
पोलिस आणि राज्य शासनाच्या वतीने मुस्लिम समालाचा टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसच्या सत्य शोधन समितीनेसुद्धा हाच आरोप केला आहे. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी मुस्लिमांवर गुन्हे दाखल केले मात्र ज्यांनी या आंदोलनाला फूस लावली त्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कुठीचा कारवाई केली नाही असाही आरोप केला आहे.या दंगलीला हिंदु विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप दिले जात असल्याचे बोलले जात आहे. अशातच या दंगलीत जखमी झालेल्या इरफान अंसारी नावाचा एक व्यक्ती मृत पावला. या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या तीन ते चार जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके चांगलेच संतापले होते. त्यांनी रात्रीच्या सुमारास तहसील ठाण्यात जाऊन पोलिसांना याचा जाबही विचारला होता. हे प्रकरण शांत होताच तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंग याची बदली करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.