'.ही कोणाची बुद्धिमानी आयडिया होती'; माजी मेजर जनरल मोदी सरकारवर भडकले
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, सेवानिवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी सैन्य भरती थांबवून लष्कराचा आकार १ लाख ८० हजारांनी कमी करण्याच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही कोणाची 'बुद्धिमानी आयडिया' होती, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला
असून, या कपातीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सूचित केले
आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना मेजर जनरल बक्षी यांनी लष्करातील
कपातीवर जोरदार टीका केली. त्यांनी विचारले की, सैन्य भरती थांबवून
मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेण्यामागे कोणता विचार होता?
केवळ पैशांची बचत करण्यासाठी अशा प्रकारे लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य आहे का? विशेषतः पहाडी आणि जंगली प्रदेशात लढण्यासाठी जमिनीवर सैन्याची गरज असते, असे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी, पहलगाममधील बैसरन व्हॅलीत हल्ला झाला तेव्हा दोन हजारांहून अधिक पर्यटक उपस्थित असूनही तिथे एकही पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हता, ही धक्कादायक माहिती समोर येत आहे, ज्यामुळे बक्षी यांच्या टीकेला अधिक बळ मिळाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाची शाखा द रेझिस्टंट फ्रंट ने स्वीकारली असून, यात दोन विदेशी आणि दोन स्थानिक दहशतवादी सामील असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज आहे. मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि पळ काढला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार आणि वृत्तांनुसार, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करण्यापूर्वी त्यांची नावे विचारून त्यांना कलमा म्हणायला लावले. नकार देणाऱ्यांवर किंवा म्हणू न शकणाऱ्यांवर निर्घृणपणे गोळ्या झाडल्या. उत्तर प्रदेशातील शुभम द्विवेदी याला नाव विचारल्यानंतर लगेच डोक्यात गोळी घालण्यात आली. महाराष्ट्रातील संतोष जगदाळे यांनाही कलमा म्हणता न आल्याने डोक्यात, कानात आणि पाठीत गोळ्या घातल्या गेल्या, असे त्यांच्या मुलीने सांगितले. दहशतवाद्यांनी जगदाळे यांच्यासोबत असलेल्या तीन महिलांना मात्र सोडून दिले. कौस्तुभ गणबोटे यांच्या पाठीत गोळ्या लागल्या.
या भ्याड हल्ल्यात एकूण २७ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात , महाराष्ट्र, कर्नाटक , तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. तसेच नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती येथील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकही मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर देशभरातील शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून बुधवारी सकाळी भारतात परतले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला पोहोचले असून ते आज पहलगामला भेट देणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही गृहमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. अमेरिका , इराण , रशिया , इटली , युएई आदी देशांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हल्ल्यानंतरचा हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.