सांगली :- संसाराची स्वप्ने झाली उद्ध्वस्त! सर्पदंश झाल्याने नवविवाहितेचा दुर्दैवी अंत; चार महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
घर सांभाळण्यासाठी प्रेमचा विवाह नात्यातील कावेरीसोबत करण्याचे ठरले. चार महिन्यांपूर्वी सोहळा झाला. कष्ट झेलत, संघर्ष करत, सासूची सेवा करत ती संसाराची स्वप्ने पाहत होती.
सांगली, तासगाव : चार महिन्यांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं. अपघातात जखमी झालेल्या सासूची सेवा करत करत ती संसारात रमली होती. मात्र, आधीच संकटांनी घेरलेल्या कुटुंबावर आज काळाने आणखी एक घाला घातला. दमूनभागून दुपारी झोपलेल्या या नवविवाहितेला नागाने दंश केला आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.
तासगाव तालुक्यातील सावळज येथील या घटनेने चव्हाण कुटुंब कोलमडून गेले. कावेरी प्रेम चव्हाण असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. घटनास्थळ व शासकीय रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, सावळजमधील चव्हाण कुटुंबाचा दगड फोडून उदरनिर्वाह चालतो. या कुटुंबावर काही महिन्यांपूर्वी आघात झाला होता.
एका अपघातात प्रेम चव्हाण यांच्या आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या अंथरुणाला खिळल्या. चूल खुंटली. घर सांभाळण्यासाठी प्रेमचा विवाह नात्यातील कावेरीसोबत करण्याचे ठरले. चार महिन्यांपूर्वी सोहळा झाला. कष्ट झेलत, संघर्ष करत, सासूची सेवा करत ती संसाराची स्वप्ने पाहत होती. प्रेम आणि त्याचे वडील काल सकाळी कामासाठी घरातून बाहेर पडले. त्यावेळी कावेरी आणि सासूबाई दोघी घरात होत्या. दुपारी जेवणानंतर कावेरी झोपल्या होत्या.
दीडच्या सुमारास नागाने त्यांना दंश केला. त्यांनी ओरडा करताच शेजारी धावले. ग्रामस्थांनी तातडीने कावेरी यांना रुग्णालयात नेले; मात्र सुटी असल्याने स्थानिक पातळीवर उपचार मिळाले नाहीत. अखेर सांगली सिव्हिलमध्ये आणेपर्यंत कावेरीचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. प्रेम, त्याचे वडील सुन्न बसले होते. गावातील नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावून नाग पकडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.