भरधाव कारची आठ वाहनांना धडक
कराड : कराड-विटा मार्गावरील कृष्णा कॅनॉल (सैदापूर) आणि कराड शहरातील कृष्णा नाका परिसरातील एरम हॉस्पिटलसमोर विटा बाजूकडून आलेल्या कारने आठ वाहनांना धडक दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत कारमधील दाम्पत्यासह पाचजण जखमी झाले आहेत. तर दोन रिक्षा, पाच दुचाकी आणि अपघातग्रस्त कारसह अन्य एका कारचे मोठे नुकसान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही शहर पोलिसांकडून सुरू होती. या अपघातात संजय सर्जेराव पवार (वय 63, मूळ रा. कडेगाव, हल्ली रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड) यांच्यासह त्यांची पत्नी सुषमा संजय पवार (54), शफिक नजीर मुजावर (28, करवडी, ता. कराड), कल्याण वासुदेव बेडके (34, सैदापूर, ता. कराड) आणि समीर ईशाद चौधरी (26, रा. सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास विटा बाजूकडून येणाऱ्या कारने दोन दुचाकींसह एका रिक्षाला जोरदार धडक दिली. तरीही चालकाने अपघातस्थळी न थांबताच कराडमधील कृष्णा नाक्याच्या दिशेने भरधाव वेगात कार नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कृष्णा नाका परिसरात एरम हॉस्पिटल परिसरातील एका दुचाकीसह झाडाला या कारने धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की मार्गालगतचे मोठे झाड अक्षरशः उन्मळून पडले. त्यानंतरही याच परिसरातील दुसऱ्या कारसह एक रिक्षा व दोन दुचाकींना अपघातग्रस्त कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षावर पलटी झाली. या रिक्षाखाली दुचाकी सापडली. या अपघातात मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी सुदैवाने जिवित हानी टळली आहे.
भरधाव वेगातील कार पलटी झाल्यानंतर कारमध्ये अडकलेल्या संजय पवार यांच्यासह त्यांच्या पत्नीला स्थानिकांनी बाहेर काढत जवळच्याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी कराड विटा मार्गावर मोठा वाहतूक कोंडी झाली होती. अपघातस्थळापासून सुमारे 50 मीटर सिग्नल असून या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र सुदैवाने काही अंतर अगोदरच कार पलटी झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.