सांगली : सावळज आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई:, डॉ. नांदिनी मालेदार बडतर्फ तर डॉ. आरती शेळके यांचं निलंबन
तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील कावेरी चव्हाण यांना सर्पदंशानंतर त्यांच्यावर उपचाराबाबत झालेल्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती शेळके यांचे निलंबन करून विभागीय चौकशी करण्याबाबतचा अहवाल उपसंचालक (आरोग्य सेवा) यांना पाठविण्यात येणार आहे, तर तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदिनी मालेदार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली. या प्रकरणाबाबतचा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना सादर केला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या सावळज येथील नवविवाहिता कावेरी चव्हाण या सोमवारी दुपारी घरी झोपल्या असताना त्यांना नागाने दंश केला होता. त्यांना सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नव्हते.वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावा लागला. आमदार रोहित पाटील यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देत कारभाराची झाडाझडती घेतली. संबंधित प्रकरणात दोषी वैद्यकीय अधिकार्यांवर कारवाई करण्यासाठी सखोल चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश तालुका आरोग्य अधिकार्यांना दिले. यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना सादर केला. गुरुवारी सायंकाळी डॉ. विजयकुमार वाघ यांनी याप्रकरणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि तदर्थ वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाईबाबतचे आदेश दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.