Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत झाली कुरुंदकर-बिद्रे यांची ओळख

सांगलीत झाली कुरुंदकर-बिद्रे यांची ओळख



सांगली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अखेर न्यायालयाने दोषी ठरवले. 17 वर्षांपूर्वी हे दोघेही सांगलीतील पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. त्यावेळी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात दोघांच्या जवळीकतेची तेव्हा जोरदार चर्चा होती. तत्कालीन पोलिस अधीक्षकांनीही याची गंभीर दखल घेतली होती. पण राजकीय वरदहस्तामुळे कुरुंदकरचे कारनामे वाढत गेले. अभय कुरुंदकर याची 2008 साली सांगलीत सहायक पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली. 


त्याच्याकडे कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला. त्याला पोलिस निरीक्षक पदावर बढती मिळाली. पुढे एक वर्ष त्याने मिरजेतील वाहतूक शाखेकडे, नंतर आर्थिक गुन्हे शाखेत व 2 जून 2010 पासून 2013 पर्यंत त्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा कार्यभार घेतला. पोलिस मुख्यालयातच एलसीबीचे कार्यालय होते. अश्विनी बिद्रे-गोरे 2006 मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून पोलिस दलात रूजू झाल्या. पुण्यानंतर त्यांची सांगलीत एलसीबीत बदली झाली. कुरुंदकर हा त्यांच्यासाठी वरिष्ठ अधिकारी. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने त्यांची ओळख वाढली. 

त्यातून जवळीक निर्माण झाली. दोघांच्या जवळीकीची चर्चा एलसीबीत मोठ्या प्रमाणात होती. बिद्रे यांना कुरुंदकर याने यशवंतनगर परिसरात भाड्याने फ्लॅट घेऊन दिल्याची चर्चा झाली होती. तो स्वतः पोलिस दलाचे वाहन वापरत नव्हता. एलसीबीच्या कार्यालयातही खासगी मोटारीनेच येत असे. एलसीबीच्या कार्यालयात अनेकदा दोघेही बोलत बसलेले असत. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतही हे प्रकरण गेले आणि चर्चा सर्वत्र होऊ लागल्याने वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बिद्रे यांची महिला कक्षात बदली केली. त्यानंतर बिद्रे यांची रत्नागिरीला, तर कुरुंदकर याचीही पालघर जिल्ह्यात बदली झाली. या काळातही अभय कुरुंदकर हा त्यांना भेटण्यासाठी रत्नागिरीत जात असल्याचे बोलले जाते. पालघर जिल्ह्यामध्ये नव्याने सुरू झालेल्या नवघर पोलिस ठाण्याचा कार्यभार त्याच्याकडे सोपविण्यात आला होता. नंतर दीड वर्षात कुरुंदकर याची ठाणे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणमध्ये बदली झाली, तर बिद्रे यांचीही 2016 मध्ये रत्नागिरीहून ठाणे जिल्ह्यात बदली झाली.

... तरीही मिळाले महासंचालकांचे पदक

एलसीबीत सलग तीन वर्षे काम करणारा कुरुंदकर तेव्हा एकमेव अधिकारी ठरला होता. दरम्यान, मनमानी कारभाराचा ठपका ठेवत तत्कालीन पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी 9 मे 2013 रोजी कुरुंदकर याच्या चौकशीचा एक अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्याच्या पोलिस महासंचालकांनाही पाठवला होता. कुरुंदकर याची बदली सांगलीतून तासगाव येथे केली. मात्र तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आदेशाला आव्हान देत कुरंदकरने ही बदली रद्द करवून घेतली. पोलिस अधीक्षकांनीही अनेकदा कुरुंदकरला सुनावले होते. 'कारणे दाखवा' नोटिसाही पाठवल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर आक्षेप नोंदविल्यानंतरही कुरुंदकरला पोलिस महासंचालकांचे पदक मिळाले होते, हे विशेष! 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.