बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली. भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून एका व्यक्तीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
किरकोळ कारणावरून पत्नीची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. सोनी देवी (वय,२५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचे चार वर्षांपूर्वी आरोपीशी लग्न झाले होते आणि गेल्या सहा महिन्यांपूर्वीच तिने बाळाला जन्म दिला होता. घटनेच्या दिवशी महिलेने भाजी बवण्यासाठी मोठा बटाटा घेतल्यामुळे आरोपीने तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर हा वाद इतका पेटला की, आरोपीने जवळ असलेल्या कुऱ्हाडीने पत्नीच्या गळ्यावर वार केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. या घटनेत काही जणांनी आरोपीला मदत केली आहे, असे समजत आहे. त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. एफएसएल टीम याप्रकरणी तपास करीत आहे. हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील कुऱ्हाड जप्त केली. आरोपी दिल्ली येथील एका खाजगी कंपनीत काम करायचा. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने त्यांच्या सहा महिन्याच्या बाळाला लपवून ठेवले. या बाळाला शोधून काढण्यास पोलिसांना यश आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.