जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणात महाराष्ट्रातील अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या कुटुंबासह अडकल्या आहेत. त्यांनी एका व्हिडिओद्वारे तेथील
परिस्थिती कथन करत, अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी
महाराष्ट्र शासनाकडे तातडीने मदतीची याचना केली आहे.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्या कुटुंबासोबत श्रीनगरला पर्यटनासाठी आल्या होत्या, मात्र हल्ल्यानंतर येथील सर्व पर्यटक प्रचंड भयभीत झाले आहेत. अनेक जण नुकतेच दाखल झाले आहेत, तर काहींच्या विमानाची तिकिटे पुढील दिवसांची आहेत. या पार्श्वभूमीवर, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना उद्देशून, इथे अडकलेल्या सर्व पर्यटकांना, विशेषतः लहान मुलांसोबत आलेल्या कुटुंबांना, तातडीने परत आणण्याची व्यवस्था करण्याची कळकळीची विनंती केली आहे.
त्यांनी सांगितले की, हल्ल्याच्या बातमीनंतर पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. एक दिवस आधी पहलगामला असताना वातावरण सामान्य वाटले होते, पण मंगळवारी हल्ल्याची बातमी कळताच त्या गंडोला परिसरात असताना त्यांना तातडीने जागा खाली करण्यास सांगण्यात आले. सध्या निर्माण झालेली भीतीदायक परिस्थिती पाहता, पर्यटकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मंगळवारी पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी रात्रीच काश्मीरला रवाना झाल्याचे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून देशात परतल्याचे वृत्त आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या अंदाजानुसार, सध्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील नागरिकांचे प्रमाण ८० ते ९० टक्के आहे.या दुर्दैवी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये डोंबिवली येथील संजय लेले (वय ४४), अतुल मोने (वय ५२), हेमंत जोशी , पनवेलमधील दिलीप देसले , तसेच पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने विमानसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.