Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुनाबद्दल सांगलीत दोघांना जन्मठेप

खुनाबद्दल सांगलीत दोघांना जन्मठेप



सांगली : पूर्ववैमनस्यातून एकाचा खून केल्याबद्दल फिरोज अलीखान इराणी (वय 60) व इरफान हैदरीफिरोज इराणी (30, दोघे रा. ख्वाजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) यांना सोमवारी जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती मीना एम. पाटील यांनी हा निवाडा दिला. सरफराज युसूफ इराणी (40, रा. ख्वाजा कॉलनी, सांगली) असे मृताचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे व सहायक जिल्हा सरकारी वकील मकरंद ग्रामोपाध्ये यांनी काम पाहिले.

 

खटल्याची पार्श्वभूमी अशी, सरफराज इराणी व आरोपींमध्ये एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद झाला होता. 20 ऑक्टोबर 2017 रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान फिरोज याने सरफराज यांना आपल्या घरी बोलावून घेतले. तेथे गेल्यानंतर चौघांनी त्यांच्या केसांना व हाताला धरुन ठेवले. इरफान याने सुर्‍यासारख्या हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये सरफराज जोराने ओरडले व गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. त्यांचे भाऊ मोहंमद यांच्यासमोर ही घटना घडली होती. त्यावेळी मोहंमद यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मोहंमद व त्यांच्या कुटुंबीयांनी जखमी सरफराज यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी मोहंमद यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिरोज अलीखान इराणी, महाराणी फिरोज इराणी, जैनबी हाशमी इराणी, मरियम नुरमहंमद इराणी, इरफान हैदरीफिरोज इराणी (सर्व रा. ख्वाजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदिवे यांनी तपास करून संशयितांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्याची आरोपींची मागणी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती, मात्र सुनावणीच्या दिवशी त्यांच्या नाशिक येथील राहत्या घरापासून न्यायालयापर्यंत पोलिस संरक्षण देण्याची मागणी मान्य केली होती.

 

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 16 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मोहंमद इराणी, निखिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदा देसाई यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही आरोपींना भा. द. वि. कलम 302 अन्वये दोषी ठरवून शिक्षा सुनावली. अन्य तीन संशयितांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. सरकार पक्षाला संजयनगर पोलिस ठाण्याकडील सुधीर पाटील, सुप्रिया भोसले, अशोक तुराई, सुनीता आवळे यांनी मदत केली.

बरगड्यात अडकलेला चाकू

इरफान याने ताकतीने सरफराज याच्या छातीत चाकू भोकसला होता. शवविच्छेदनादरम्यान हा चाकू उपसून काढावा लागला होता. वार इतका खोलवर होता की चाकू तुटून त्यातील काही भाग सरफराज याच्या बरगड्यामध्ये अडकला होता, अशी साक्ष डॉक्टरांनी सुनावणीदरम्यान दिली. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.