दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर खंडणी प्रकरणातून सुटला
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणी प्रकरणात निर्दोष ठरवण्यात आलं आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी खंडणीच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली. खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपांसह कासकर याच्यावर मोक्कांतर्गत खटला चालवण्यात आला. विशेष मोक्का न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी या खटल्याचा शुक्रवारी निकाल देताना कासकर याची त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांतून पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.
कासकर हा सध्या ठाणे तुरुंगात बंदिस्त असून त्याच्यावर आर्थिक गैरव्यवराहाप्रकरणी दाखल खटला प्रलंबित आहे. त्यामुळे, त्याची या खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असली, तर त्याला कारागृहातच राहावे लागणार आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, कासकर याने 2015 मध्ये ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे 30 लाख रुपये आणि चार सदनिकांची मागणी केली होती.
छोटा शकील फरार आरोपी
कासकर याने प्रकरणातील एका सह-आरोपीच्या नावे एक सदनिका नोंदणीकृत केली तसेच 30 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा पोलिसांचा आरोप आहे. यासहआरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. कासकर आणि दुसऱ्या एका आरोपीविरुद्ध ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच नंतर कासकर याच्यासह अन्य आरोपींवर मोक्कांतर्गत खटला चालवण्यात आला. या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा शकील याला फरार आरोपी दाखवण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वीही कासकर याची दक्षिण मुंबईतील सारा-सहारा मार्केट प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.