कवठे एकंद : कुमठे (ता. तासगाव) येथील पोलिस पाटील, प्रगतिशील बागायतदार प्रकाश सावंता माळी यांच्या 'अनुष्का' जातीच्या द्राक्षांना मुंबई मार्केटमध्ये चांगली पसंती आहे. प्रति चार किलो द्राक्षाला ३०१ रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे.
कुमठेच्या पूर्व भागात असलेल्या माळी यांची शेती आहे. द्राक्षशेतीत हातखंड असणाऱ्या प्रकाश माळी व कुटुंबीयांनी द्राक्षशेतीत विविध प्रयोग करत आधुनिकतेला महत्त्व देत उत्पन्नवाढीबरोबर बदल स्वीकारले. द्राक्ष पीक नाशवंत, पण शाश्वत दर देणारे नसले तरीही द्राक्ष पिकातून चांगले उत्पन्न घेता येते. योग्य व्यवस्थापन, बाजारपेठेचा कौल, हवामानाचा अभ्यास अशा गोष्टींना महत्त्व देत कुटुंबाला उभारी मिळाली आहे.
द्राक्ष शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. उत्तम खतासाठी जनावरांचे संगोपन करण्यावर भर दिला आहे. द्राक्षशेतीसमोर नैसर्गिक व कृत्रिम आव्हाने आहेत. अशा स्थितीत यंदा अनुष्का द्राक्षांच्या संगोपनासाठी काटेकोर नियोजन व चांगले व्यवस्थापन करीत एक एकर द्राक्षबाग फुलवली. गोडी, योग्य आकार, आकर्षक घडांमुळे मुंबई येथील एस. एम. फ्रुट कंपनीच्या सलीम गुड्डू यांनी उच्चांकी दर देऊन द्राक्ष खरेदी केली. चार किलोच्या प्रतिपेटीस ३०१ रुपये असा दर मिळाला. तीन हजार पेटी माल निघेल, असा अंदाज आहे. आगाप छाटणी न घेता फळ छाटणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली. बाजारपेठेतील मालाची आवक, मागणी व दर याचे सातत्याने अवलोकन केले. यंदा रमजान महिना व शेवटच्या टप्प्यात द्राक्षांना चांगली मागणी वाढून अपेक्षित दर येईल, अशी अपेक्षा आहे.- प्रकाश माळी, द्राक्ष बागायतदार
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.