सह्याद्री अभेद्य; बाळासाहेब अपराजित
कराड : तिरंगी लढतीमुळे राज्याचे लक्ष लागलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी सहकार मंत्री व विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत कारखान्याची एकहाती सत्ता कायम ठेवली विरोधी दोन्ही पॅनेलला 8 हजारहून अधिकच्या मताधिक्याने पराभवास सामोरे जावे लागले आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील पॅनेलने 21/0 असा मोठा विजय मिळवला. या विजयामुळे कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वर्चस्वाला धक्का बसला आहे. विरोधातील तिसरे पॅनेल सत्ताधाऱ्यांसमोर निष्क्रिय ठरले.
सह्याद्री कारखाना स्थापनेनंतर ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना पुन्हा एकदा ताब्यात ठेवण्यात बाळासाहेब पाटील यांना यश मिळाले आहे. अपराजित राहण्याचा विक्रम कायम राखत त्यांनी सह्याद्री अभेद्य ठेवला. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी पहिल्यांदाच तिरंगी झाली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनल, आमदार मनोजदादा घोरपडे व उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील स्व. यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीत कदम, भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या नेतृत्वाखालील निवासराव थोरात पॅनेल प्रमुख असणारे यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल अशी तिरंगी लढत झाली होती.
21 जागेसाठी तिन्ही पॅनेलचे 61 उमेदवार व अपक्ष 9 असे 70 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामुळे सुरुवातीपासूनच मोठी चुरस पाहायला मिळाली आमदार मनोज घोरपडे यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. 4 ते 5 हजाराच्या मतांनी पॅनेल निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी जाहीर सभांमधून व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात सभासद मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. सभासद बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पाठीशी ठाम राहिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.
सह्याद्री कारखान्याचे कराड, सातारा, कोरेगाव, खटाव व कडेगाव अशा पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र असून 32205 सभासद कारखान्याचे मतदार आहेत. यापैकी 26081 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सहा गट व चार आरक्षित प्रवर्गातून एकूण 21 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी 99 मतदान केंद्रांवर मतपत्रिकेद्वारे मतदान झाले मतमोजणी कराड येथील राज्य वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये रविवारी सकाळी 8 वाजता सुरू झाली दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या फेरीत 1 ते 50 केंद्रांवरील मतांची मोजणी करण्यात आली, तर दुसऱ्या फेरीत 51 ते 99 मतदान केंद्रांवरील मते मोजण्यात आली. पहिल्या फेरीचा निकाल दुपारी दोनच्या दरम्यान जाहीर करण्यात आला.या फेरीत पी डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार सुमारे 4 हजारांच्या मतांनी आधाडीवर राहिले. मतदारांचा हाच ट्रेंड कायम राहतो असा विश्वास व्यक्त करत पी. डी. पाटील पॅनेलच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधाळण करत जल्लोष करण्यास सुरुवात केली. निकालाचे कल लक्षात येताच बाळासाहेब पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील निवारास्थानाबाहेरही गावागावातील कार्यकर्ते जमा झाले. यावेळी विजयाची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. जेसीबीने गुलाल उधळण्यात आला.
मतमोजणीत एक ते सहा ऊस उत्पादक गट व चार प्रवर्गात पी. डी. पाटील पॅनेलचे उमेदवार सुरूवातीपासूनच आघाडीवर राहिले. 1 ते 50 मतदान केंद्रामध्ये प्रामुख्याने तांबवे, सुपने, वारूंजी, केसे, कराड, कडेगाव, कडेपूर खोडशी, वहागाव, चरेगाव, इंदोली, उंब्रज, वडोली भिकेश्वर आदी मोठ्या लोकसंखेच्या गावांचा समोवश आहे. या सर्व गावातून पी.डी. पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी मतांची आघाडी घेतली. आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या उमेदवारांचा प्रभाव कोणत्याच केंद्रावर जाणवला नाही. तिसरे पॅनेल पूर्ण अपयशी ठरले सत्ताधारी व विरोधी पॅनेलच्या मांमध्ये मोठा फरक राहिल्याने बाळासाहेब पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते व विविध गावच्या पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. अंतिम निकाल हाती आला त्यावेळी पी.डी. पाटील पॅनेलने 8 हजारांचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय मिळवला. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला सरासरी 15500 मते मिळाली आहेत काँग्रेसचे निवास थोरात, भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांच्या पॅनेलला 2200 मते मिळाली.सभासद, शेतकऱ्यांची साथ मिळाली पाटील
यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारे पी. डी. पाटील पॅनेलने या निवडणुकीत मोठे यश मिळविले आहे. कारखाना यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर चालत आहे. पी. डी. पाटील यांचे या कारखान्यामध्ये मोठे योगदान राहिले आहे या योगदानातून हा कारखाना उभा राहिला आहे. सर्वसामान्य सभासद, शेतकरी यांची मोठी आणि प्रामाणिक साथ मिळाली, अशी प्रतिक्रिया चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली.
सभासदांचा कौल मान्य आ. मनोजदादा घोरपडे
सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी मी ही निवडणूक लढवली नव्हती शेतकरी, सभासदांना न्याय मिळावा, सभासद मालक म्हणून कारखान्यात राहावा, ही प्रामाणिक भावना होती पराभवाने खचून न जाता सभासदांच्या न्याय हक्कासाठी भविष्यातही लढत राहणार आहे. सोबत राहणाऱ्या सभासदांना धन्यवाद देतो, अशी प्रतिक्रिया आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.