कोणी बनला खेळणी विक्रेता, कोणी दुकानदार; आंतरजिल्हा टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी केलं वेषांतर
कोल्हापूर : अट्टल घरफोडे यात्रेत आकाश पाळणे उभारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संशयित साथीदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी थेट समोर जाणे जिकिरीचे होते. मग, एका पोलिसाने खेळणी विक्रेत्याचा पेहराव केला, तर दुसऱ्याने दुकानदार असल्याचे भासवले. श्रीवर्धन (जि. रायगड) येथील यात्रेत सहा तास रखरखत्या उन्हात थांबून सलीम शेख, जावेद शेखची 'कुंडली' बनवूनच स्थानिक गुन्हे शाखेचे हे पथक परतले.
संशयित कोल्हापूरकडे येत असताना आंबा घाटात त्यांच्या मुसक्या आवळल्या. या टोळीकडून तब्बल ३२ घरफोड्या उघडकीस आणण्याची कामगिरी पथकाने बजावली. कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या घरफोड्यांबाबत मागील दोन वर्षांपासून पोलिसांचे पथक माहिती घेत होते. गुन्ह्यांची पद्धत पाहून चोरटे कोण असावेत, असे अंदाज बांधले जातात; परंतु काही घरफोड्यांमध्ये संशयितांकडून पोलिसांची दिशाभूल करण्यात येत होती; परंतु पथकाने आपली जिद्द सोडली नव्हती.
चोरीच्या दुचाकींचा वापर
जिल्ह्यातील विशिष्ट घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीच्या दुचाकींचा वापर करून त्या सोडून दिल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्या परिसरातील मोबाईल सीडीआरची माहिती घेत चोरट्यांबाबत माहिती संकलित करण्याचा प्रयत्न केला; पण यामध्येही यश येत नव्हते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजचाही आधार घेता येत नव्हता. तपासाची सूत्रे पुन्हा वेगवेगळ्या दिशेला फिरवावी लागली.
सलीम शेखची लागली माहिती....
सलीम शेख हा महाडमधील अट्टल घरफोड्या असून, त्याच्यावर १२ गुन्हे दाखल होते. महाडवरून येणारा चोरटा रात्रीच्या वेळेस साथीदारांसह घरफोडी करत असल्याची पक्की खबर लागल्याने पोलिसांनी महाडमध्येच आपले लक्ष केंद्रित केले होते; पण २०१८ ते २०२१ पर्यंत तो मुंबईच्या तळोजा कारागृहात असल्याने तो कारागृहातून सुटल्यानंतर आल्याची माहिती मिळाली.
दोन महिन्यांनी बदलायचा नंबर
सलीम शेख हा त्याचे साथीदार जावेद आणि तौफिक यांच्यासोबत बोलण्यासाठी वापरलेले सीमकार्ड दोन महिन्यांत फेकून द्यायचा. तसेच फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या कोणत्याही अकाऊंटचा वापर तिघेही करीत नव्हते. यामुळे त्यांच्याविषयी अधिकची माहिती मिळविण्यात अडचणी आल्या होत्या.
यात्रांमध्ये आकाश पाळण्यांचा धंदा
सलीम, जावेद यांचा आकाश पाळण्यांचा वडिलार्जित धंदा आहे. दोघेही यात्रांमध्ये हे पाळणे उभारत होते. त्यांच्यावर संशय असल्याने पोलिसांनी ते जातील तिथे पाळण्यांच्या परिसरात वेशांतर करून त्यांची अधिकाधिक माहिती संकलित केली होती. तिसरा भाऊ तौफिक हा रंगकाम करण्याच्या बहाण्याने फिरून रेकी करीत असल्याची माहिती समोर आली.
वेषांतर अन् कष्टाचे झाले चीज
पोलिस अंमलदार सागर माने, संजय कुंभार, महेश खोत, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे यांनी शेख बंधूंवर रायगड जिल्ह्यात फिरून त्यांच्यावर वॉच ठेवला होता. प्रसंगी यात्रेत खेळणी विकणे, गृहोपयोगी साहित्य विकणे, चावी बनविणारा असेही फंडे पोलिसांनी आजमावले. या माहिती आधारेच चोरट्यांना पकडण्यात आल्याने पोलिसांच्या कष्टाचे चीज झाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.