सांगली : सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मीफाटा येथे दुचाकी आणि मालवाहतुकीची समोरासमोर धडक होऊन तरुण ठार झाला. अनिल अरुण मोहिते (वय 36, रा. सांगलीवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात सोमवार दि. 31 रोजी दुपारी
झाला. एकेरी वाहतुकीमुळे तरुणाचा बळी गेल्याची चर्चा सुरू होती. याबाबत
ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मृत मोहिते हे एका वाहन कंपनीचे जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. सोमवारी सकाळी दुचाकीवरून ते आष्टा येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी ते सांगलीवाडीकडे परतत असताना लक्ष्मीफाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू होती. त्यावेळी सांगलीतून आष्ट्याच्या दिशेने निघालेला मालवाहतूक टेम्पो (एमएच 12 जेएफ 7388) समोरून आला. या टेम्पोने मोहिते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात मोहिते यांच्या डोक्याला गंभीर मार लागला व त्यांचा जागी मृत्यू झाला.
आठवड्यात दुसरा अपघात
सांगली ते आष्टा या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. चारच दिवसांपूर्वी आष्टा येथे झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर सोमवारी लक्ष्मी फाटा येथे आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. एकेरी वाहतुकीमुळे हा अपघात झाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगले यांनी तातडीने रस्त्याच्या कंत्राटदाराशी संपर्क केला. रस्ता दुभाजक आणि कामाचे फलक प्रत्येक ठिकाणी लागले पाहिजेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.