7/12 उताऱ्यावर वारस नोंद कशी करायची? राज्य सरकारच्या 'या' मोहिमेत १ रुपयाही न देता होणार वारसनोंदी; अर्जासोबत तलाठ्यांना कोणती कागदपत्रे द्यावी लागणार, वाचा...
सोलापूर : महसूल विभागाने 'जिवंत सातबारा' ही मोहीम सुरू केली असून चावडी वाचनाचा पहिला टप्पा पार पडला आहे. आता उद्यापासून (शनिवार) ज्यांच्या उताऱ्यावर वारसनोंद करायची आहे, त्यांनी वंशावळीसंदर्भातील वारसांचे प्रतिज्ञापत्र, संबंधित मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला आणि सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ भरून द्यावे लागणार आहे.
सोलापूरसह राज्यातील लाखो सातबारा उताऱ्यावरील मृत व्यक्तींच्या नावांमुळे मालमत्तेची खरेदी-विक्री, बँक कर्ज प्रकरण करायला अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यभरात 'जिवंत सातबारा' मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १ ते ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक गावातील तलाठ्यांकडील सातबारा उताऱ्यांचे चावडी वाचन करायचे होते. त्यानंतर आता पुढील टप्प्यात ज्यांच्या सातबारा उताऱ्यावर मृताचे नाव काढून वारसनोंद करायची आहे.
त्यांनी मूळ कागदपत्रे तलाठ्यांकडे जमा करायची आहेत. त्यानंतर ई-फेरफार प्रणालीवर वारस ठराव मंजूर करून घेऊन २१ एप्रिल ते १० मे या काळात फेरफारवर बदल केला जाणार आहे. मंडलाधिकारी त्यासंबंधीचा अंतिम निर्णय देऊन फेरफारमध्ये बदल करतील. १० मेनंतर वारसनोंदी लागलेले सातबारा उतारे संबंधितांना वितरित केले जाणार आहेत.
शहरी भागात १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्राचे बंधन
गावांमधील सातबारा उताऱ्यांवरील वारसनोंदीसाठी साध्या कागदावरील प्रतिज्ञापत्र चालणार आहे, कारण अर्जदाराला सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ भरून द्यावे लागणार आहे. पण, शहरी भागात त्या व्यक्तीला ओळखणारे कोणी नसते. त्यामुळे त्यांना १०० रुपयांच्या स्टॅम्पवर महा ई-सेवा किंवा तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रावर केलेले प्रतिज्ञापत्र (वंशावळ व माझ्याशिवाय अन्य कोणी वारस नसल्याबद्दल) जोडून अर्ज करावा लागणार आहे. वारसनोंदीत फसवणूक होऊ नये म्हणून तलाठ्यांनी अर्जासोबत मूळ मृत्यू दाखला जोडण्याचे बंधन घातले आहे.
'जिवंत सातबारा' मोहिमेला सुरवात
राज्य शासनाच्या जिवंत सातबारा उताऱ्याची मोहीम जिल्ह्यात सुरू झाली असून त्याअंतर्गत चावडी वाचन पूर्ण झाले आहे. अर्जदारांनी त्यांच्या सातबारावरील मृत व्यक्तीचे नाव काढून वारसाची नोंद करण्यासाठी प्रतिज्ञापत्र, प्रपत्र-५, ज्या मृत व्यक्तीचे नाव कमी करायचे त्यांचा मूळ मृत्यू दाखला जोडून अर्ज करायचा आहे. शहरी भागातील अर्जदारास १०० रुपयांच्या बॉण्डवर प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. - अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल), सोलापूर
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.