मुंबई : लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकार उत्पन्न वाढीची नवनवीन मार्ग शोधत आहे. त्याचवेळी केवळ स्टँम्प ड्युटीने सरकारच्या तिजोरीत मोठा निधी जमा झाल्याचे समोर आले आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात टार्गेटपेक्षा तब्बल 7 हजार कोटी रुपये अधिकचे जमा झाले आहेत. मुद्रांक शुल्क विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 50 हजार कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले होते, पण त्यात 5 हजार कोटींची वाढ करण्यात आली होती. तरीदेखील, राज्यातील खरेदी-विक्रीच्या 29 लाख व्यवहारांमधून तब्बल 57 हजार 442 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. आजवरील ही मुद्रांक शुल्कापोटी जमा झालेली उच्चांकी रक्कम आहे.
2025-26 मध्ये आणखी पैसे वाढणार :
राज्य सरकारने 2025-26 आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरच्या दरात (वार्षिक बाजारमूल्य दरात ) सुमारे 4.39 टक्के वाढ केली आहे. यात महापालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे 5.95 टक्के, तर ग्रामीण भागात 3.36 टक्क्यांनी वाढ केली आहे. मंगळवार (1 एप्रिल) नवे दर लागू होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सदनिका आणि जमिनींच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
दरवर्षी नोंदणी व मुद्रांक विभागाकडून जमीन आणि घरांशी संबंधित रेडीरेकनरचे नवे दर जाहीर होतात. एक एप्रिलला हे दर लागू होतात. त्यानुसार नागरिकांना त्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. हे दर इतर विभागही ग्राह्य धरतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मागील दोन वर्षांपासून सरकारने ही वाढ केली नव्हती. त्यामुळे यंदा हे दर वाढणार हे निश्चित समजले जात होते. मात्र, ही वाढ किती होणार? याबाबत उत्सुकता होती. आता ही दर वाढ निश्चित झाल्याने पुढच्या वर्षी स्टँम्प ड्युटीच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत अतिरिक्त पैसा जमा होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.