बुर्ज खलिफा इमारतीमधील 22 फ्लॅट्सचा मालक आहे 'हा' भारतीय उद्योगपती
पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी दुबई हे शहर निर्विवादपणे जगातील एक महत्वाचे डेस्टिनेशन बनले आहे. याच दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. सौंदर्य आणि अलिशान सुविधांचा मिलाफ असलेल्या या इमारतीत 163 मजले आहेत. ही इमारत पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. तथापि, या इमारतीत वास्तव्य करणे सर्वांसाठी शक्य नाही, कारण ते परवडणारे नाही. त्यामुळे ही जागा वास्तव्याच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण याच बुर्ज खलिफा इमारतीत भारतातील एका उद्योगपतीचे एक-दोन नव्हे तर चक्क 22 फ्लॅट स्वतःच्या मालकीचे आहेत. कोण आहे आहे उद्योजक जाणून घेऊया....
900 फ्लॅट्सपैकी 150 फ्लॅट्स भारतीयांच्या मालकीचे
या भारतीय उद्योगपतीचे नाव आहे जॉज व्ही. नेरेम्पराम्बिल. बुर्ज खलीफामधील एका वन बीएचके फ्लॅटचे वार्षिक भाडे 150000 ते 180000 दिरहम (42 लाख रुपयांपेक्षा अधिक) आहे. विशेष म्हणजे, या इमारतीतील 900 फ्लॅट्सपैकी 150 फ्लॅट्स भारतीयांच्या मालकीचे आहेत. आणि त्यातील 22 फ्लॅट्स् एकट्या नेरेम्पराम्बिल यांच्या मालकीचे आहेत.
जॉर्ज हे बुर्ज खलीफामधील सर्वात मोठे खाजगी मालक
स्थानिक मीडिया जॉर्ज यांना "किंग ऑफ बुर्ज खलीफा" असे संबोधते. 22 फ्लॅट्सच्या मालकीमुळे जॉर्ज हे बुर्ज खलीफामधील सर्वात मोठे खाजगी मालमत्ता मालक आहेत. केरळच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या जॉर्ज यांनी वयाच्या 11 वर्षांपासूनच कुटुंबाच्या पालनपोषणासाठी वडिलांसोबत काम सुरू केले होते. जॉर्ज लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. त्यांनी कापसाच्या बीजातून गोंद काढून पैसे कमावण्यास सुरुवात केली होती.
मेकॅनिक ते बिझनेस टायकून
1976 मध्ये जॉर्ज यांनी शारजा येथे संधीच्या शोधात स्थलांतर केले. येथे त्यांनी आधी मेकॅनिक म्हणून काम सुरू केले. मिडल ईस्ट देशांतील वाढती अर्थव्यवस्था आणि वाळवंटातील झपाट्याने वाढणाऱ्या उकड्यामुळे एयर कंडीशनिंग व्यवसायात उत्तम संधी आहे, असे त्यांना वाटले. त्यातून त्यांनी स्वतःची एक छोटी कंपनी सुरू केली. आज ही कंपनी GEO ग्रुप ऑफ कंपनीज म्हणून ओळखली जाते. जॉर्ज आज दुबईचे एक प्रसिद्ध बिझनेस टायकून बनले आहेत.
नातेवाईकाने मारला टोमणा तेव्हापासून विकत घेतले फ्लॅट्स
जॉर्ज यांच्या बुर्ज खलीफामध्ये फ्लॅट्स खरेदी करण्यापाठीमागे एक रोचक कथा आहे. एका नातेवाईकाने जॉर्ज यांना टोमणा मारला होता की ते कधीही बुर्ज खलीफामध्ये जाऊ शकणार नाहीत. ते जॉर्ज यांनी खूपच मनावर घेतले. त्यानंतर जॉर्ज यांनी 2010 मध्ये बुर्ज खलीफामध्ये पहिला एक फ्लॅट भाड्याने घेतला. नंतर त्यांनी हळूहळू फ्लॅट्स खरेदी करायला सुरवात केली आणि आज त्यांच्याकडे या इमारतीतील 22 फ्लॅट्स आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, जॉर्ज यांच्या फ्लॅट्सच्या भिंती, छत आणि फरशीवर गोल्ड प्लेटेड डेकोरेशन केले आहे. जॉर्ज यांची नेटवर्थ 4800 कोटी रूपयांहून अधिक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.