10 आणि 500 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट समोर, RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली महत्वाची माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. 10 आणि 500 रुपयांच्या नोटांच्या बाबतीत नवीन अपडेट समोर आली आहे. लवकरच 10 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी करण्यात येणार असल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी सांगितले की ते लवकरच महात्मा गांधी (नवीन) मालिके अंतर्गत 10 आणि 500 रुपयांच्या नोटा जारी करणार आहेत. ज्यावर नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे.
मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, या नोटांची रचना सर्व बाबतीत महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील 10 आणि 500 रुपयांच्या सध्याच्या नोटांसारखीच आहे. नवीन नोटा जारी केल्या तरी, रिझर्व्ह बँकेने यापूर्वी जारी केलेल्या 10 आणि 500 रुपयांच्या सर्व नोटा कायदेशीर निविदा राहतील. गेल्या महिन्यात, RBI ने गव्हर्नर मल्होत्रा यांच्या स्वाक्षरी असलेल्या 100 आणि 200 रुपयांच्या बँक नोटा जारी करण्याची घोषणा केली होती. मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये RBI गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची जागा घेतली आहे.रेपो दर 9 तारखेला जाहीर होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 7 एप्रिलपासून सुरू होत आहे. आरबीआयचे गव्हर्नर 9 एप्रिलला पतधोरण जाहीर करतील. चालू आर्थिक वर्षातील ही पहिली बैठक असणार आहे. त्यामुळं ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या बैठकीत रेपो दरात 0.25 टक्के कपात केली जाऊ शकते. असे झाल्यास रेपो दरात सलग दुसऱ्यांदा कपात केली जाईल. त्यानंतर रेपो दर 6 टक्क्यांवर येतील. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. फेब्रुवारीमध्ये आरबीआय गव्हर्नरने 0.25 टक्के कपातीची घोषणा केली होती.
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे 1990 च्या बॅचे आणि राजस्थान केडरचे सनदी अधिकारी आहेत. त्यांनी कानपूरमधून कंप्यूटर विज्ञान मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवली आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. संजय मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणी इत्यादींसह विविध क्षेत्रांमध्ये काम केले आहे. अर्थ मंत्रालयात सचिव (महसूल) म्हणून काम पाहिलं आहे. त्यांनी भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिवपद भूषवले होते. संजय मल्होत्रा यांना राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्राचा मोठा अनुभव आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.