Sangli: 'छावा'त झळकला शिराळ्याचा सागर रसाळ
शिराळा : शिराळ्याला नागपंचमी प्रमाणेच इतिहासही आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न झाला होता. याचप्रमाणे सध्या सर्वदूर चर्चेत असलेल्या 'छावा' चित्रपटाने देशभर व देशाबाहेर चित्रपटगृहात मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य व स्वराज्याप्रती असलेले प्रेमाला पुन्हा एकदा प्रकर्षाने उजाळा मिळाला आहे. या चित्रपटातील विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिकेतील कामाला विशेष पसंती मिळाली आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सहकलाकार म्हणून शिराळ्याचा सागर वसंत रसाळ चमकला आहे.
सागर रसाळ सामान्य कुटुंबातील युवक. उपाहारगृह व्यवस्थापन (हॉटेल मॅनेजमेंट) शिक्षण घेऊन गोवा राज्यात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीस आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सागरने नोकरीबरोबर अभिनय जोपासला. कोल्हापुरात एका खासगी संस्थेत अभिनयाचे शिक्षण घेतले. दूरचित्रवाणीवरील मराठी मालिकेतील कामाबरोबर लघु चित्रपटातील काम केले. विश्वासघात, चिताड, स्वच्छता अभियान, फ्रेंडशीप, लव्हशिप, टमरेल, आदी लघुचित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळविण्यासाठी तो जिद्द व चिकाटीच्या जोरावर धडपडत आहे. आजवर त्याने अभिनय क्षेत्रात चांगलाच प्रवास केला आहे. मराठी चित्रपट ७, हिंदी, दाक्षिणात्य व हॉलिवूड प्रत्येकी एक, मराठी मालिका ८, लघु चित्रपट ७, हिंदी मालिका १ अशा भूमिका साकारल्या आहेत. यातून त्याच्याजवळील अभिनयाची धडपड लक्षात येते.
मालिकांतील भूमिका
'जीव तुझ्यात गुंतला' 'शेतकरी नवरा', 'आभाळाची माया' मालिकेत न्यायाधीशाची भूमिका, 'सुंदरी' मालिकेत 'पोलिस उपनिरीक्षक', 'तुझ्यात जीव रंगला', 'गजानन महाराज' मालिकेत सावकाराची भूमिका, 'आभाळाची माया भाग-२' मध्ये डॉक्टर, 'मिट्टी से बंधी डोर' या हिंदी मालिकेत भूमिका त्याने साकारल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.