सांगली : महायुती सरकारने सत्तेवर येताच आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका सुरू केला आहे. आता मार्च महिना सुरू झाल्याने कार्यकाल पूर्ण होत असलेल्या अधिकाऱ्यांना बदलीचे वेध लागले आहेत. त्यासाठी फिल्डिंगही लावली जात आहे. त्यातच सांगली जिल्ह्यातून जाता जाता पोस्टिंगची किंमत वसूल करण्याची चढाओढच लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मंथली वाढवून देण्याचे निरोप संबंधितांना धाडले जात आहेत.
महायुती सरकारने सत्तेवर येताच आयएएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. कालपासून आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. त्यातच आता मार्च सुरू झाल्याने कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. या काळात चांगल्या पोस्टिंगसाठी देणे-घेणे करावे लागत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून बाहेर बदली झाल्यानंतर तेथे क्रीम पोस्टिंग मिळावी यासाठी अधिकारी आतापासूनच फिल्डिंग लावत आहेत. या पोस्टिंगसाठी देणे-घेणे करावे लागणार असल्याचे गृहीत धरून गोळा करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
आता जिल्ह्यातून बाहेर जायचे असल्याने राहिलेल्या काही दिवसांत जास्तीत जास्त मिळवण्यासाठी संबंधित लोकांना मंथली वाढवून देण्यासाठी निरोप धाडले जात आहेत. त्यामुळे मंथली देणाऱ्यांनीही आ वासला आहे. आता अधिकाऱ्यांची तोंडे मोठ्या प्रमाणात उघडली जात असल्याने संबंधितांनी नवीन अधिकारी येईपर्यंत व्यवसायच बंद ठेवण्याचा किंवा हद्द बदलून इतरत्र व्यवसाय हलवण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र आर्थिक संस्थांच्या वसुलीसोबतच मंथली वाढवून देण्याचे निरोप आल्याने मार्च महिना फक्त भागवण्यासाठीच तयार झाला आहे की काय अशी शंका संबंधित व्यक्त करत आहेत. बदल्यांच्या चर्चेसोबतच मंथली वाढवण्याच्या चर्चाही आता जिल्ह्यात जोर धरू लागल्या आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.