सांगली : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून तरुणाचा मृतदेह अंत्यसंस्कारास नेण्यासाठी नातेवाईकांनी महापालिकेच्या शववाहिकेचा नंबर डायल केला. मात्र हा नंबर अस्तित्वात नाही', असे उत्तर येत होते. नागरिकांनी माजी नगरसेवकांशी संपर्क साधला. त्यांनी महापालिकेत धाव घेऊन चौकशी केली असता शववाहिका चालकाला दिलेले सीमकार्ड बंद असल्याचे समजले. महापालिकेने अधिकारी, अत्यावश्यक सेवांकडील कर्मचाऱ्यांचे १५० सीम बंद केल्याची माहिती समोर आली. त्याचा परिणाम सेवांवर होत आहे.
शहरातील एका तरुणाने आत्महत्या केली होती. या तरुणाचा मृतदेह घराकडे व तिथून अंत्यसंस्कारासाठी नेण्यास महापालिकेच्या शववाहिकेचा नंबर डायल करून संपर्क करण्यात येत होता. मात्र सीमकार्ड बंद होते. काही नागरिकांनी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी शववाहिकेचे दोन्ही नंबर डायल करून पाहिले. मात्र दोन्हीही नंबर अस्तित्वात नव्हते. अखेर ते महापालिकेत गेले. तेथील कर्मचाऱ्याने शववाहिका चालकाला फोन लावला. मात्र चालकाचा नंबर बंद होता. दुसऱ्या चालकाला फोन लावला, तर तो ड्युटीवर नव्हता. त्याने ड्युटीवर असलेल्या चालकास फोन लावला, तर त्याचेही सीम बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही. ड्युटीवरील चालक शोधण्यात वेळ गेला. शववाहिका मिळण्यास दीड तास लागला. मृतदेह नेण्यास विलंब झाल्याने नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.प्रशासकीय कारभार गतीने व्हावा, यासाठी पदाधिकारी, अधिकारी व खातेप्रमुख तसेच अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी यांना महापालिकेतर्फे १५० सीमकार्ड दिले होते. त्याचा प्रत्येकी दोनशे रुपयांचा बोजा महापालिकेवर पडत होता. शिवाय अनेक पदाधिकारी, नगरसेवकांनी कार्यकाल संपला तरी सीम जमा केले नव्हते. आर्थिक बोजा कमी करणे व सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाने १५० सीमकार्ड बंद केल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.