नागपूर : भारताची सर्वात मोठी संपत्ती ही आजचे तरूण आहेत. भातातील तरुणांमध्ये आत्मविश्वास आहे. त्यामुळे हे तरुण 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाचा झेंडा हाती धरतील. देशातील सर्व नागरिकांना चांगल्या प्रकरची आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे ही आमची प्राथमिकता आहे. गरीब घरातील मुलांना सोयीस्कररित्या
शिक्षण घेता यावे, त्यांचेही डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे, याकरिता
आता वैद्यकीय शिक्षण मराठीमध्ये घेता येणार असल्याची घोषणा पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केली.
नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. नागपूरमधील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर आणि दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पंतप्रधान म्हणून संवैधानिक पदे भूषवत असताना नरेंद्र मोदी संघाच्या मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील सर्वात गरीब व्यक्तीलाही सर्वोत्तम उपचार मिळाले पाहिजेत. कोणताही नागरिक उपचारापासून वंचित राहू नये. देशासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या वृद्धांना उपचाराची चिंता नसावी, हे धोरण सरकारचे आहे. त्यामुळेच आम्ही आज आयुष्यमान भारतमुळे कोट्यवधी लोकांना मोफत उपचारांची सुविधा देत आहोत.जर आपण आपल्या देशाच्या इतिहासावर नजर टाकल्यास आपण शेकडो वर्षे गुलामगिरीत जगलो. इतके हल्ले झाले. भारताची सामाजिक रचना नष्ट करण्याचे देखील अनेकदा प्रयत्न झाले. परंतु भारताची जाणीव कधीच संपली नाही. सर्वात कठीण काळातही आपल्या संतांनी भक्तीच्या कल्पनांनी आपल्या राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा दिली. जगात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तरी भारत हा पूर्ण समर्पणाने सेवेसाठी उभा राहतो. म्यानमारमध्ये इतका मोठा भूकंप झाला आहे. ऑपरेशन ब्रह्याच्या माध्यमातून भारत तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वात आधी पोहोचला. जेव्हा नेपाळमध्ये भूकंप झाला. मालदीवमध्ये पाण्याचे संकट आले, तेव्हा देखील सर्वात प्रथम भारताने मदत केली, असे मोदी म्हणाले.
एम्स संस्थांची संख्याही वाढवली
आम्ही केवळ वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट केली नाही तर एम्स संस्थांची संख्याही वाढवली आहे. अधिकाधिक डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय जागांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. याशिवाय, गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहोत. हजारो जनऔषधी केंद्रे देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात औषधे पुरवत आहेत. देशभरातील शेकडो डायलिसिस सेंटर मोफत डायलिसिस सेवा देत आहेत. गेल्या 10 वर्षांत गावांमध्ये लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरे बांधण्यात आली आहेत, जिथे देशातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून टेलिमेडिसिनद्वारे सल्लामसलत, प्रथमोपचार आणि पुढील वैद्यकीय मदत दिली जात आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
संघ हे एक संस्कार यज्ञ
संघ शंभर वर्षांपासून राष्ट्रीय जाणीव प्रबळ करण्याचे काम करत आहे. दृष्टी आणि दिशा या दोन भिन्न गोष्टी आहेत. बाह्य आणि अंतर्गत दृष्टी आवश्यक आहे. गुलाबराव महाराज यांनी आपल्या अंतर्गत दृष्टीतून अनेक ग्रंथ लिहले. संघ हे एक संस्कार यज्ञ आहे. ते प्रत्येक स्वयंसेवकाला अशीच अंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टी देण्याचे काम करते. आपले शरीर हे परोपकारासाठी आहे. सेवा संस्कारात आली की ती साधना बनते. संघाच्या अनेक पिढ्यांनी आपल्या सेवा कार्यातून संस्था उभ्या केल्या आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.