वाराणसी : देशभरात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळत असून हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येत ईद साजरी करत आहेत. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक सलोखा जपला जात आहे. तर, देशभरातील मुस्लिम बांधव इदगाह आणि मस्जिदमध्ये जाऊन ईदची नमाज अदा करत
आहेत. मात्र, उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथील एका महिलेनं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोरच नमाज अदा केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेनं ईदची नमाज अदा केली. तसेच, कार्यालयातील खांबाला गळाभेटही दिल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. या घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सदरील महिलेचा शोध घेतला जात असून जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.
हमीरपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारावर महिलेकडून नमाज पठण केले जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, महिला कार्यालयासमोरच नमाज अदा करते. त्यानंतर, येथील एका खांबाला अलिंगन देऊन मनातील भाव व्यक्त करत असल्याचं दिसून येत आहे. महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासन व पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नमाज अदा केल्यानंतर संबंधित महिला प्रवेशद्वारावरुन बाहेर निघूनही गेली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराहून पोलीस कर्मचाऱ्यांसमोरुन ती कार्यालयीन आवारात आली. त्यानंतर, येथील वसरीत तिने बिनधास्तपणे नमाज अदा केली, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांना या घटनेचे गांभीर्य लक्षात आले, त्यानंतर महिलेची शोधाशोधू सुरू झाली आहे.
महिलेचा शोध सुरू, दोषींवर कारवाई होणार
दरम्यान, ADM विजय शंकर तिवारी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, एक महिला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नमाज अदा करण्यासारखं काहीतरी करत असल्याचं एका व्हिडिओतून समोर आलं आहे. याप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. घटनास्थळावर जे अधिकारी होते, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असे तिवारी यांनी म्हटले. दरम्यान, संबंधित ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या पोलिसांकडून माहिती घेऊन, चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल. सध्या, महिलेचा शोध घेतला जात आहे, असेही तिवारी यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.