मुंबई : ''राज्य सरकारमधील मंत्र्यांवर झालेले आरोप कारवाईला पात्र असतील तर ताबडतोब त्यांचे राजीनामे घेतले जातील,'' अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील कार्यवाहीला न्यायालयाने स्थगिती दिली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मात्र त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.
राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन आजपासून (ता. ३) सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. उपमुख्यमंत्र्यांबरोबर कोणताही व्यक्तिगत संघर्ष सुरू नसून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत, असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले. कोणत्याही प्रकारचा आदेश दिलेला नसताना आरोग्य खात्याबाबत जी चर्चा सुरू आहे ती योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप झाल्याबाबत विचारले असता फडणवीस यांनी, हे आरोप कारवाईस पात्र असतील, तर त्या मंत्र्यांचे राजीनामे लगेचच घेतले जातील, अशी ग्वाही दिली. कृषीमंत्री कोकाटे यांच्यावरील कार्यवाहीला न्यायालयानेच स्थगिती दिल्याने त्यांच्यावर सुनील केदार यांच्याप्रमाणे कारवाई झाली नाही. केदार यांच्यावरील कारवाईवरही स्थगिती आली होती, ती न्यायालयाने उठवल्यानंतर कारवाई झाली होती, हे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल मात्र त्यांनी थेट कोणतेही उत्तर न देता या संबंधातील भूमिका यापूर्वीच स्पष्ट केल्याचे सांगितले.
'बातम्या वस्तुस्थितीला धरून असाव्यात'
फडणवीस म्हणाले,''केंद्र सरकारने जनआरोग्य अभियानाअंतर्गत ज्या अटी पाठवल्या आहेत त्यातील काही अटींची पूर्तता करण्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे काही बदल झाले आहेत. त्या बदलांसंबंधीचे आदेश आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांनी काढले असताना यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातून हालचाल झाली असल्याची चर्चा कपोलकल्पित आहे. वर्तमानपत्रांनी सरकारवर अंकुश ठेवण्यास, योग्य मार्गदर्शन करण्यास आमचा अजिबात विरोध नाही; पण ते करताना वस्तुस्थितीला धरुन नसलेल्या बातम्या छापल्या जाऊ नयेत.''
निवेदनपत्रावर सह्याच नाहीत
विरोधकांनी दिलेल्या निवेदनाच्या पत्राचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले,''त्यांच्या पत्रावर काही जणांच्या सह्याच नाहीत. एक जण आमदार आहे का याचा आम्ही तपास घेतो आहोत. हे पत्र वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे पत्र दिले गेले आहे. राज्यातील समस्यांसंदर्भात विरोधकांनी सादर केलेल्या किंवा वेळोवेळी उपस्थित झालेल्या प्रश्नांना सरकार विधिमंडळात उत्तर देईल. नवे आमदार निवडून आले असल्यामुळे त्यांना चर्चेला वेळ देणे उचित ठरेल.'' चर्चेतून मार्ग निघतील आणि लोकशाही सक्षम होईल, अशी अपेक्षाही देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
संवाद आवश्यक
विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 'नवे सरकार असल्यामुळे संवादाला प्रारंभ करायची संधी होती. संवाद सुरु व्हायला हवा होता, अशी अपेक्षा विरोधकांनीही व्यक्त केली आहे. मग तो संवाद करण्यासाठी चहापानाला उपस्थित राहणे योग्य ठरले असते,' असेही फडणवीस यांनी नमूद केले. सरकारशी समन्वय साधून संवाद करत महाराष्ट्राच्या प्रश्नांची उकल करण्यात विरोधकांनी रस दाखवावा, असेही त्यांनी आवाहन केले .
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.