नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय, 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या नेत्या हिमानी नरवाल यांची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा काँग्रेसच्या त्या युवती नेत्या होत्या. त्यांच्या समाज माध्यमांवर त्यांनी अनेक
नेत्यांसोबतची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह
असेल, असे पोलिसांना सांगण्यात आले. पोलिसांनी त्यावर तपास करून पाहिला
असता खरोखर सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह होता. या घटनेने हरियाणा आणि
रोहतकमध्ये खळबळ उडाली आहे.
काँग्रेसच्या युवा नेत्या हिमानी या राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्या सोबतही त्या चालताना दिसली. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सक्रीयपणे काम केले. भूपेंद्र सिंग हुड्डा आणि दीपेंद्र सिंग हुड्डा यांच्या निवडणूक प्रचारातही त्यांनी सहभाग नोंदवला होता. महिला काँग्रेस कार्यकर्त्याच्या खळबळजनक हत्येमुळे राज्यातील वातावरण जोरदार तापले आहे.
नेमकी हत्या कशी झाली?
रोहतकमधील सांपला उड्डाणपुलाजवळ एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला रोहतकमधील विजय नगर येथील रहिवासी आहे. ती महिला २२ वर्षांची आहे. काही रस्त्याने जाणाऱ्यांनी सुटकेस पाहिली आणि पोलिसांना कळवले. गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे, असे समलखा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बिजेंद्र सिंह यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे समजते.
कोण होत्या हिमानी नरवाल?
मृत महिलेची ओळख पोलिसांनी पटवली असून काँग्रेस कार्यकर्त्या नेत्या हिमानी नरवाल या मूळच्या रोहतकमधील विजय नगर येथील आहेत. हिमानी राजकीयदृष्ट्या समाज माध्यमांवर खूप सक्रीय होत्या. त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला होता. हरियाणातील भारत जोडो यात्रेतील नियोजनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. हरियाणा निवडणुकीत अनेक काँग्रेस नेत्यांच्या प्रचारातही त्या सक्रिय होत्या. हिमानी नरवालचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याची बातमी मिळताच संपूर्ण हरियाणात एकच खळबळ उडाली.
काँग्रेस आक्रमक, एसआयटी चौकशीची मागणी
काँग्रेसच्या विविध आमदारांनी हिमानी नरवाल यांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस आमदार भारत भूषण बत्रा यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.