राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकारने 2022 मध्ये सुरू केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील हजारो गोरगरिब कुटुंबांना फटका बसणार आहे. ही योजना नेमकी काय होती? ही योजना का बंद करण्यात आली? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आनंदाचा शिधा योजना काय होती?
आनंदाचा शिधा या योजनेत गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळीला राज्य सरकारकडून 100 रुपयात एक किलो तेल, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ आणि एक किलो साखर दिली जात असे. यामुळे गरीब कुटुंबे सण आनंदाने साजरा करत होते, मात्र आता ही योजना बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता गुढीपाडव्याला आनंदाचा शिधा मिळणार नाही. याचा फटका हजारो कुटंबांना बसणार आहे.
योजना का बंद होणार?
राज्य सरकारकडून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी जवळपास 1 कोटी 60 लाख पात्र लाभार्थींना आनंदाचा शिधा दिला जात होता. यासाठी प्रत्येक सणाला 350 कोटींचा खर्च येत होता. मात्रा आता या योजनेला अखेर ब्रेक लागला आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे भार वाढला?
राज्यातील लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. पात्र लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. लवकरच ही रक्कम 2100 रुपये केली जाणार आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील भार वाढत चालला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही योजना बंद तर होणार नाही ना अशी चर्चा रंगली होती, मात्र ही योजना बंद होणार नसल्याचे समोर आले आहे.आगामी काळात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे सरकारी तिजोरीवरील भर आणखी वाढणार आहे. याच कारणामुळे आनंदाचा शिधा ही योजना बंद करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. तसेच सरकार आगामी काळात अनेक कल्याणकारी योजनाही बंद करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.