Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा

परळीत सापडले १०९ अज्ञात मृतदेह, खासदार बजरंग सोनावणे यांचा सनसनाटी दावा
 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत अनेक दावे केले जात आहेत. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील घनिष्ठ संबंधांवरही उघडपणे बोललं जात आहे. दरम्यान, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी परळीबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. परळीमध्ये १०९ अज्ञात मृतदेह सापडल्याचा दावा बजरंग सोनावणे यांनी केला आहे.

आधीच बीड जिल्ह्यातील वातावरण स्फोटक बनलेलं असताना बजरंग सोनावणे यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले की, महादेव मुंडेंची हत्या हीसुद्धा दुर्दैवी घटना आहे. मात्र आता उघडकीस आलेली दोन चार प्रकरणं आहेत. मात्र पण असे १०९ मृतदेह बीड जिल्ह्यात परळी भागात सापडले आहेत. त्यांचं काय झालंय, त्यांची हत्या झाली आहे, हार्ट अॅटॅक आलाय, अपघात झालाय की आणखी काही झालंय, हे कळायला मार्ग नाही. मात्र अशा १०९ मृतदेहांचा पंचनामा झालेला आहे. तसेच अज्ञात म्हणून त्याबाबत कुठलीही कारवाई झालेली नाही. असे प्रकार आमच्या जिल्ह्यात घडतात आणि ते परळीमध्ये घडले आहेत. त्यामुळे येथील राजकारणाचा या प्रवृत्तीला पाठिंबा आहे, असं येथील लोकांना वाटत आहे, असा दावाही बजरंग सोनावणे यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, आता कुणीही बोलताना जातीपातीवर येतंय. मात्र बीड जिल्ह्यात जातीपातीचा विषय नाही, तर प्रवृत्तीचा विषय आहे. तसेच ही प्रवृत्ती कुठल्या एका जातीची नाही आहे, तर ही प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीचे लोक, दहशत निर्माण करणारे भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे बजरंग सोनावणे म्हणाले. 

दरम्यान, याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं असून, एखादा मृतदेह सापडल्यावर हत्या किंवा खून हे सुरुवातीला निश्चितपणे सांगता येत नाही. जेव्हा अकस्मात मृत्यू होतात तेव्हा सखोल चौकशी केली जाते. संबंधितांचे जबाब नोंदवले जातात. सखोल चौकशीअंतीच पोलीस प्रशासन निष्कर्षाप्रत येतं. दरम्यान, परळीमध्ये वर्षभरात सापडलेले १०९ मृतदेह हे हत्या किंवा खून नसून अकस्मात मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी केलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.