मुंबई : मुंबईच्या अंधेरी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एका आयटी कंपनीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली होती. ईडीकडून ठिकाणांची झडती सुरू असताना आयटी फर्मच्या अध्यक्षांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील एका बड्या कंपनीच्या
अध्यक्षांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
दिनेश नंदवाना असं मृत पावलेल्या 62 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते मुंबई स्थित वक्रांगी टेक्नॉलॉजी फर्मचे अध्यक्ष होते. शुक्रवारी सकाळी अंधेरी (पूर्व) येथील त्यांच्या निवासस्थानी ईडीकडून झडती घेतली होती. ही झडती घेतली जात असतानाच नंदवाना यांचं निधन झालं आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. पण शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलीय.
ईडीकडून झडती सुरू असताना नंदवाना यांच्या प्रकृतीत अचानक शारीरिक गुंतागुत निर्माण झाली आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जालंधर येथील ईडीच्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांसह दिनेश नंदवाना यांच्या मुंबईतील विविध ठिकाणांवर छापेमारी केली होती. छापेमारीदरम्यान, कारवाईचा भाग म्हणून ईडीकडून संबंधितांचे जबाब नोंदवले जातात. घरातील सदस्यांच्या हालचालींवर बंधणं घातली जातात. शुक्रवारी देखील ईडीकडून अशाच प्रकारे कारवाई केली जात असताना नंदवाना घाबरले आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय. ईडीकडून नंदवाना यांच्याशी गैरवर्तन केल्याची कोणतीही तक्रार अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.