Congo: गूढ रोगाने 50 हून अधिक लोक दगावले, लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या 48 तासांत मृत्यू
किन्शासा, (काँगो): काँगोमध्ये एका अज्ञात रोगामुळे आतापर्यंत ५० लोकांचा मृत्यू झाला आहे. रोगाची लक्षणे दिसायला लागल्यापासून अवघ्या ४८ तासात रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे या अज्ञात रोगाबद्दल लोकांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली आहे, असे उपचार करणारे डॉक्टर आणि जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इतक्या कमी कालावधीमध्ये रुग्ण मरण पावणे ही खरोखर चिंतेची गोष्ट असल्याचे प्रादेशिक देखरेख केंद्र असलेल्या बिकोरो हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक सर्ज नगालेबाटो यांनी सांगितले.
या रोगाची लागण २१ जानेवारीपासून झाली. या एकाच दिवशी तब्बल ४१९ रुग्णांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातील ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. बोलोको शहरातल्या ३ बालकांनी वटवाघूळ खाल्यानंतर ४८ तासातच रक्तस्रावासह तापाची लक्षणे दिसली आणि या मुलांचा मृत्यू झाला होता, असे डब्लूएचओच्या आप्रिकेसाठीच्या कार्यालयाने सांगितले.
या अज्ञातरोगाच्या साथीचा दुसरा टप्पा ९ फेब्रुवारीला बोमाटे शहरातून सुरू झाला. त्यावेळी १३ प्रकरणांमधील ९ रुग्णांचे नमुने काँगोची राजधानी किन्शासामधील इन्स्टिट्युट फॉर बायोमेडिकल रिसर्चमध्ये तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. या सर्व नमुन्यांची ईबोला आणि मार्बर्ग या सातीच्या आजाराची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र काही नमुन्यांमध्ये मलेरियाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ज्या जमातांमध्ये वन्य पशुंचे सेवन करण्याची प्रथा असते, अशा जमातीत रोग पसरून मानवामध्ये लवकर संक्रमित होण्याची शक्यता अधिक असते. गेल्या दशकभरात आप्रिकेत अशा रोगांची साथ ६० टक्क्कयांपेक्षा अधिक पसरली आहे, असे डब्लूएचओने २०२२ मध्ये म्हटले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.