नाशिकः हॉटेल एक्सप्रेस इनच्या प्रांगणात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. चारचाकी वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ध्रुव राजपूत (वय ५) असं या चिमुकल्याचे नाव असून चारचाकी वाहनाच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव आपल्या वडिलांसोबत हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून परतत असताना हा भीषण अपघात झाला. हॉटेलच्या प्रांगणात ग्रे रंगाची कार प्रवेश करत असताना ध्रुव अचानक पळत गाडीसमोर गेला. वाहनचालकाला वेळेत काही कळण्यापूर्वीच गाडीचे चाक थेट ध्रुवच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. ही संपूर्ण घटना हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
या फुटेजमुळे अपघाताचे नेमके कारण आणि परिस्थिती दिसून आली आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर ध्रुवला तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी अवस्थेमुळे डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर ध्रुवच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि मित्र परिवार हळहळ व्यक्त करत आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून चालकाची चौकशी सुरू आहे. तसेच दोषी चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहेया प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तर हॉटेल प्रशासनाचीही चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर हॉटेलच्या सुरक्षितता उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉटेल परिसरात वाहनांच्या हालचालीसाठी अधिक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ध्रुव राजपूतच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या पाच वर्षांच्या ध्रुवच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा आघात झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा वाहनचालकांच्या असावधतेच्या आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेच्या गरजेवर प्रकाश टाकला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.