शरद पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील भाजपाच्या संपर्कात ?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्याचे सूचक विधान केल्यानंतर, महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याच्या भाजपामध्ये प्रवेशाबाबत चर्चांना वेग आला आहे. या चर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलयांचे नाव मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे.
भाजपासोबत जवळीक का?
जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सांगली येथे राजारामबापू शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे ते भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.जयंत पाटील भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे का ?
जयंत पाटील आणि भाजपा यांच्या जवळिकीच्या चर्चा २०१९ पासून सुरू आहेत. त्यावेळीही त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्या वेळी अजित पवारांनी बंड करत सत्तेचा तडजोडीचा फॉर्म्युला शोधला आणि जयंत पाटील राष्ट्रवादीसोबत राहिले. मात्र, सध्याची परिस्थिती वेगळी आहे.
भाजपा प्रवेशामागील संभाव्य कारणे :
प्रदेशाध्यक्षपदावरील संघर्ष - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्षपदावरून रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. साखर कारखान्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील आणि सहकारी साखर कारखान्यांना निधीची गरज आहे. घटलेले मताधिक्य - सात वेळा निवडून आलेल्या इस्लामपूर मतदारसंघात ७०,००० मताधिक्य १२,००० वर आले आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय गणिते लक्षात घेऊन सत्ता जवळ करणे त्यांना महत्त्वाचे वाटत असावे. मंत्रिपदाची संधी - भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.जयंत पाटील भाजपामध्ये गेले तर फायदा कोणाला?
जर जयंत पाटील भाजपामध्ये गेले, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलू शकतात. सांगली, कोल्हापूर आणि सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. जयंत पाटील यांचा शेतकरी वर्गावर प्रभाव असल्याने भाजपाला ग्रामीण भागात अधिक बळ मिळू शकते.
मौन आणि संभ्रम
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते, मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निकाल निराशाजनक होते. पराभवानंतर जयंत पाटील यांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाही, तसेच पक्षांतर्गत बैठकीत प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी आठ दिवसांची मुदत मागितली होती, पण महिनाभर झाल्यावरही काही निर्णय घेतला नाही.
वाढदिवसानंतर मोठा निर्णय?
जयंत पाटील १६ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यानंतर १७ फेब्रुवारीला नितीन गडकरी यांच्या हस्ते सांगलीतील आरआयटी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात जयंत पाटील आणि भाजपा नेत्यांची जवळीक अधोरेखित होऊ शकते. त्यामुळे ते वाढदिवसानंतर भाजपामध्ये प्रवेश करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जयंत पाटील यांच्या मौनामुळे त्यांच्या निकटच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जर त्यांनी पक्षांतर करायचेच ठरवले, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पेक्षा ते भाजपाला प्राधान्य देतील, असे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब त्यांचे मौन सुटल्यावरच होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.