सांगली : अंधश्रद्धांच्या माध्यमातून महिलांना अज्ञानात ठेवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महिला या प्रगतीपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे त्यांना अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंचच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती आदाटे यांनी केले.
कुपवाड मधील शिवशक्तीनगर येथे गणेश जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी- कुंकू कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आदाटे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, महिला या परंपरेने अंधश्रद्धा जोपासत आल्या आहेत. परंतु त्यांच्या माध्यमातून पुढच्या पिढीवर अंधश्रद्ध संस्कार होत असतात. मुलेही पुढे अंधश्रद्ध बनतात. त्यामुळे त्यांचीही प्रगती खुंटते. पुढची पिढी सक्षम घडवायची असेल तर महिलांनी वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून स्वावलंबी बनले पाहिजे. स्वावलंबनातूच सबलता येते. महिलांना धर्माची भीती घालून समाजातून किंवा घरातून त्यांचे शोषण तर होत नाही ना याची काळजी घेतली पाहिजे.तसेच या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना दुय्यम स्थान तर असतेच परंतु आपण महिला पण काही कमी नाही अशा कार्यक्रमांना जाणीवपूर्वक सौभाग्यवती असलेल्या महिलांनाच बोलावून हा कार्यक्रम करतो यातुन कळते की आपल्यातच किती विषमता आहे.हळदी कुंकुचा आणि सुहासिनीचा काडीमात्र संबंध नाही ते एक सौंदर्याचे लक्षण आहे .आणी या निमित्ताने आपण एकत्र येऊन विचांराची देवाणघेवाण करण्यासाठी सहभागी होत असतो.परंतु आपण काय करतो ठराविक महिलांनाच बोलावून भेदभाव करतो आणि आपल्या अस्तित्वाचा अपमान आपणच करतो हे चुकीचे आहे .त्यामुळे सर्वच महिलांना बोलावून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा तसेच वाण म्हणून महापुरुषांची छोटी छोटी पुस्तके वाटा तरच खर्याअर्थाने परिवर्तन होईल. यावेळी या समितीच्या संघटक प्रियांका तुपलोंडे तसेच बाबासाहेब मुंजे, दीपक वेदपाठक, संतोष काळेल, प्रकाश गायकवाड, सर्जेराव पवार, अनिल कोळी, प्रकाश मोरे, शारदा माने उज्वला वाघ तसेच भागातील नागरीक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.