दारू पाजून पतीचा गळा चिरला, प्रियकराच्या मदतीनं बाईकवरून मृतदेह फेकला; मुंबईतली धक्कादायक घटना
मुंबई, ता. १०: पतीची हत्या करणाऱ्या विवाहितेस मालवणी पोलिसांनी सोमवारी (ता. १०) बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात विवाहितेच्या प्रियकरालाही अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येनंतर पतीचा मृतदेह निर्जन ठिकाणी फेकण्यासाठी महिलेस प्रियकराने मदत केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाल्याचे सांगण्यात आले.
राजेश चौहान (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून, तो पत्नी पूजासोबत मालवणी झोपडपट्टीत राहत होता. राजेशचा मृतदेह रविवारी (ता. ९) मालवणी पोलिसांना सोहम कंपाउंड येथील निर्जन ठिकाणी आढळला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता शनिवारी रात्री दुचाकीवरून आलेल्या तरुण-तरुणीने हा मृतदेह येथे फेकल्याचे स्पष्ट झाले.प्रियकर भाऊ असल्याचं सांगितलं
पोलिसांनी तातडीने मृतदेह फेकणाऱ्या दोघांची ओळख पटवली. यामध्ये आरोपी पूजाला ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत तिने पती राजेशची हत्या केल्याचे कबूल केले. राजेशला दारूचे व्यसन होते; दारूच्या नशेत घरी येऊन तो दररोज मारहाण करत होता. या जाचाला कंटाळून पूजाने शनिवारी रात्री तो नशेत असताना स्वयंपाकासाठी वापर होणाऱ्या चाकूने गळ्यावर वार करून त्याची हत्या केली.
आरोपी इम्रान गेल्या दोन महिन्यांपासून राजेश आणि पूजासोबत त्यांच्याच घरात राहत होता. तो आपला भाऊ असल्याचे पूजाने राजेशला सांगितले होते, अशी माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान प्राप्त झाली. त्यामुळे ही हत्या पूजाने इम्रानच्या मदतीने केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पोलिस अधिक तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.