संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांनी
पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य करत तपास यंत्रणांवर विश्वास व्यक्त केला
आहे. नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना सुरेश धस यांनी कृष्णा आंधळे
परराज्यात लपून बसला असण्याची शक्यता वर्तवली. ते म्हणाले, 'तो कोकरू आहे,
कुठेही लपला तरी तो सापडेल. पोलिस आणि गृहविभागावर आमचा पूर्ण विश्वास
आहे. आकाच्या आकाची पिलावळ आहे आणि त्यांचा माज जिरणार आहे.' यावेळी त्यांनी तपासाच्या काही गोष्टी
गोपनीय असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच धनंजय देशमुख
यांना समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे
परळीतील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. सुरेश धस यांनी सांगितले की,
परळीतील सुमारे 500 व्यापारी आणि नागरिकांनी गाव सोडले आहे. त्यांनी आरोप
केला की, 'परळीमध्ये अनेक माफिया आहेत - राख माफिया, वाळू माफिया यांचा
प्रभाव वाढत आहे. त्यामुळे लोक असुरक्षित वाटत आहेत.' दरम्यान, करुणा
मुंडे यांनी या प्रकरणात राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, पंकजा
मुंडे यांच्याबद्दल अधिक माहिती करुणा मुंडे यांच्याकडेच असल्याचे सुरेश
धस यांनी सूचित केले.
या प्रकरणात पाच पोलीस अधिकारी निलंबित करण्यात आले आहेत. आंदोलकांची मागणी 12 पोलिसांना निलंबित करण्याची होती, मात्र प्रशासनाला दोन्ही बाजूंनी परिस्थिती पाहावी लागते, असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा संपूर्ण विषय घातला असून, इतर मागण्या एका महिन्यात पूर्ण होतील. यानंतर आंदोलकांना पुन्हा रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.