इन्स्टाग्रामवरून प्रेम; लग्नही केलं, पण सासऱ्याला खुपलं, जावयाला अर्धनग्न करून दोन दिवस...
कोल्हापूर: आंतरजातीय विवाह केला म्हणून तरुणाचे अपहरण करून मारण्याचा कट कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावला आहे. मुलीच्या वडिलांनीच हे धक्कादायक कृत्य केलं आहे. इन्स्टाग्रामवर ओळख होऊन मुलगा आणि मुलीने प्रेम विवाह केला होता. कोल्हापुरातून अपहरण झालेल्या युवकाची सांगलीमधून पोलिसांनी सिनेस्टाईल सुटका केली आहे. विशाल अडसूळ असं या तरुणाचं नाव आहे.
मुलीच्या वडिलांनी त्यांच्या जावयाला सांगलीमधल्या घरात कोंडून ठेवलं होतं. तसंच जावयाला दोरीने बांधून जबर मारहाण करण्यात आल्याचंही उघड झालं आहे. पोलिसांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तरुणाची सुटका केली आहे. मुलीने प्रेम विवाह केला म्हणून बापाने जावयाला अर्ध नग्न अवस्थेमध्ये दोन दिवस कोंडून ठेवलं होतं. अखेर पोलिसांनी विशालची सुटका केली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
जावयाला कोल्हापुरातून किडनॅप केलं
9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 वाजून 15 मिनिटांच्या दरम्यान करवीर तालुक्यातील 26 वर्षांच्या विशाल अडसूळ याला रस्ता दाखवण्याच्या बहाण्याने अर्टिगा गाडीतून तीन युवकांनी सोबत घेतले. मुलगा सापडत नसल्यामुळे विशालच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर विशालला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार करण्यात आली होती.
एरटिगा गाडी कुठे गेली याचा शोध पोलीस घेत होते, पण त्यांना यात यश येत नव्हतं. विशाल अडसूळ याचा प्रेम विवाह झाला असून त्याच्या सासऱ्यांनीच विशालला किडनॅप केलं आहे, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांच्या पथकाने विशालचे सासरे राहत असलेल्या मिरज सांगलीमधल्या कुपवाडमध्ये सापळा रचला, यात पोलिसांनी सासरे श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतलं.
सांगलीच्या घरात कोंडून ठेवलं
सासऱ्यांना विशाल कुठे आहे? हे विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी आणखी चौकशी केली असता सासऱ्यांनी विशालला वेदस अपार्टमेंट मिरज सांगलीमध्ये कोंडून ठेवल्याचं कबूल केलं. विशालला किडनॅप करण्यात 6 जणांनी मदत केल्याचंही सासऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. सासऱ्यांच्या सांगण्यावरून पोलीस वेदस अपार्टमेंटमध्ये गेले. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला, तेव्हा त्यांना विशाल अत्यंत जखमी आणि हात बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला. यानंतर पोलिसांनी जखमी विशालला रुग्णालयात पाठवलं. विशालवर सध्या उपचार सुरू असून त्याची मानसिक अवस्थाही अत्यंत खराब आहे. श्रीकृष्ण कोकरे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इतर दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर उरलेल्या चार साथीदारांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.