तिसरे अपत्य लपविण्यासाठी कागदपत्रात खाडाखोड; निवृत्त वैद्यकीय अधीक्षकासह ६ जणांवर गुन्हा
पाचोड : तिसरे अपत्य झाल्याने ग्रा.पं.चे सदस्यत्व जाईल, या भीतीने पैठण तालुक्यातील कोळी बोडखा येथील एका ग्रा.पं. सदस्याने पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शासकीय कागदपत्रात खाडाखोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी ६ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार शनिवारी रात्री पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कोळी बोडखा येथील ग्रामपंचायत सदस्य देवीदास दुर्योधन मगरे यांच्या पत्नी मीनाक्षी या प्रसूतीसाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात ६ मे २०२१ रोजी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांच दिवशी त्यांना तिसरे अपत्य झाले. तिसरे अपत्य झालेल्या ग्रा.पं. सदस्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते, असा शासन निर्णय असल्याने आपले ग्रा.पं. सदस्यत्व वाचविण्यासाठी देवीदास मगरे यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने यांना हाताशी धरून प्रसूती झालेल्या महिलेच्या नावातील रजिस्टरवर खाडाखोड करून तेथे मीनाक्षी देवीदास मगरेऐवजी देवीदास यांचे मेव्हणे कैलास पोटफाडे यांच्या पत्नी लक्ष्मी कैलास पोटफोडे (रा. राक्षसभुवन) असे बनावट नाव नोंदविले. फिर्यादी दिनेश मगरे यांनी माहिती अधिकारात याबाबत माहिती मागितली. त्यामुळे ही बाब उघडकीस आली.
न्यायालयाच्या आदेशानुसार झाली कारवाई
याप्रकरणी दिनेश मगरे फिर्यादी यांनी पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली; परंतु पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यामुळे मगरे यांनी पैठण येथील न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी देवीदास दुर्योधन मगरे, मीनाक्षी देवीदास मगरे, कैलास सुदाम पोटफोडे, तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर, तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी भोजने, अधिपरिचारिका मिसाळ यांच्याविरोधात पाचोड पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे, पोलिस उपनिरीक्षक राम बाराहाते करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.