सांगली : बँकेतील निवृत्त कर्मचाऱ्यास अकाऊंट सस्पेंड होईल अशी भीती घालून ऑनलाइन 'केवायसी' पूर्ण करतो असे सांगून खाते 'हॅक' करून २१ लाख ७५ हजार रूपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या फसवणुकीबाबत दिलीप मारूतीराव शिंदे (रा. प्रथमेश बंगला, घनशामनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलीप शिंदे हे बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये ते घरी असताना त्यांना एका मोबाइल क्रमांकावरून एसएमएस आला. त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे खाते आज सस्पेंड होईल. तुम्ही बँक व्यवस्थापक राहुल गुप्ता यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क सांगा असे नमूद केले होते. शिंदे यांनी थोड्या वेळाने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मी राहुल गुप्ता हेड ऑफिस, बँक ऑफ इंडिया मुंबई येथून बोलतो आहे असे सांगितले.
तुमचे अकाऊंट सस्पेंड झाले असून ते ॲक्टिव्ह करण्यासाठी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, बँकेच्या खात्याला लिंक असलेला मोबाइल क्रमांक विचारून घेतला. तसेच एक व्हॉटस्अॅप क्रमांक देऊन त्यावर माहिती शेअर करायला सांगत मोबाइल सुरूच ठेवला. शिंदे यांनी सांगितलेल्या व्हॉटस्अॅप क्रमांकावर आधार कार्ड नंबर, खात्याला जोडलेला मोबाइल क्रमांक, पिन क्रमांक शेअर केला.राहुल गुप्ता म्हणून बोलणाऱ्या व्यक्तीने तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तुमचे खाते ऑनलाइन करत आहे, असे सांगून मोबाइल चालू ठेवा अशा सूचना केल्या. १५ ते २० मिनिटात प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगितले. परंतु एवढ्या कालावधीत शिंदे यांचे खातेच भामट्याने 'हॅक' केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातील २१ लाख ७५ हजार रूपये परस्पर काढून घेतले.
बँकेच्या खात्यातील मोठी रक्कम काढून घेतल्याचे दिसून येताच शिंदे यांना धक्का बसला. त्यांनी दि. १५ नोव्हेंबर रोजी बँकेशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. गेले काही दिवस तांत्रिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दि. ११ रोजी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बीएनएस ३१८ (४), ३१९ (२), माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ही आश्चर्यचकित
बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी पूर्ण करण्यास सांगून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. परंतू निवृत्त बँक कर्मचाऱ्यांचीच अशा प्रकारे फसवणूक केल्यामुळे पोलिस ही आश्चर्यचकित झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.