Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फडणवीसांचा शिंदेंना धक्का, सरनाईकांकडून एसटीचं स्टिअरिंग हिसकावलं

फडणवीसांचा शिंदेंना धक्का, सरनाईकांकडून एसटीचं स्टिअरिंग हिसकावलं
 

मुंबई : रायगड आणि नाशिक जिल्हा पालकमंत्री पदावरून सत्ताधारी महायुतीत धुसफूस सुरू असताना भाजपने बुधवारी (5 फेब्रुवारी) 17 जिल्ह्यात संपर्क मंत्र्यांची नेमणूक जाहीर केली. पक्ष आणि सरकार यामध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा संपर्क मंत्री नियुक्त केल्याचे भाजपने म्हटले असले, तरी ज्या जिल्ह्यात भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यात संपर्क मंत्री देऊन पक्षाने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शह दिल्याचे बोलले जाते. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. गृह विभागाने राजपत्र प्रकाशित करत पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी आयएएसची नियुक्ती केली आहे.

राज्यात 2014 साली युती सरकारच्या काळात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेकडे होते. 2014-2019 या काळात एसटी महामंडळाचे अध्यक्षपद शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्याकडे होते. यानंतर 2019 मध्ये मविआ सरकारच्या काळात शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. यावेळी शिंदे सरकारच्या काळात नियमामध्ये बदल करून एसटीचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सप्टेंबर 2024 मध्ये भरत गोगावले यांना बळ देण्यासाठी आणि मंत्रिपदापासून वंचित राहिल्याने असलेली नाराजी दूर करण्यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने एसटी महामंडळाचे अध्यक्ष त्यांना करण्याचा निर्णय घेतला होता.

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी विभागाचे मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणीही नाही. परिवहन मंत्री या नात्याने शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक हे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषवत होते. एसटीच्या उत्पन्नवाठीसाठी प्रताप सरनाईक यांनी नुकताच कर्नाटक राज्याचा दौराही केला होता. अलीकडेच प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून एसटी महामंडळात नवीन अध्यक्षाची त्वरित नियुक्ती करण्याची विनंती केली होती. 2014 ते 2019 या काळात परिवहन मंत्र्यांकडेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद होते. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल, अशी अपेक्षा प्रताप सरनाईक यांना होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी प्रताप सरनाईकांना धक्का देत एसटीच्या अध्यक्षपदी आयएएस आधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.

सरकारने आज एक राजपत्र जारी करून अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी असलेले परिवहन सचिव संजय सेठी यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासंदर्भात आज गृहविभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांच्यात विभागाने संजय सेठी यांची नियुक्ती केल्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.