बसमधील प्रवाशांकडील दागिने लुटणाऱ्या हातकणंगलेतील दोन महिलांना अटक पाच लाखांचा ऐवज जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : सांगली मध्यवर्ती बसस्थानक तसेच बसमधून प्रवास करणाऱ्यांकडील दागिने लुटणाऱ्या हातकणंगले येथील दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचे पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
वर्षा इकबाल लोंढे (वय ३५), सपना राजू चौगुले (वय २७, रा. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. बसस्थानकावर तसेच बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांकडील दागिने चोरणाऱ्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत होते. त्यावेळी अंकलीतील एका खेळण्याच्या दुकानाजवळ दोन महिला चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तेथे सापळा लावला. त्यानंतर संशयित महिला तेथे आल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळ दागिने सापडले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी बसस्थानकावरून प्रवाशांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. दोघींना अटक करून त्यांच्याकडील दागिने जप्त करण्यात आली. त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, उदय साळुंखे, संजय पाटील, अतुल माने, दुर्गा कुमरे, सुनील जाधव, रोहन गस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.