ड्रग्ज, नशेची इंजेक्शनचा पर्दाफाश करणाऱ्यांची पदकांसाठी शिफारस करू पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची माहिती
सांगली : विट्यातील एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उध्वस्त करणाऱ्या तसेच औषधी इंजेक्शन्स आणि गोळ्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या पोलिस अधिकारी, अंमलदार यांची महासंचालक पदक किंवा राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करण्यात येईल अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, नशेच्या इंजेक्शन प्रकरणात उत्तरप्रदेश येथून पुरवठा करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत तो कुरियरद्वारे पुरवठा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये त्याच्यासह कुरियर कंपनी किंवा अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा कसून तपास सुरू आहे. या चौकशी ज्यांची नावे निष्पन्न होतील त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येणार आहे. या टोळीची पाळेमुळे खणून काढण्याचे आदेश महात्मा गांधी चौक पोलिसांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
विट्याजवळील कार्वे येथील एमडी ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही कराराशिवाय जागा भाड्याने देणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. संबंधित महिला सावकारी करत होती का किंवा हवाला रॅकेट चालवत होती का याचा तपास सुरू आहे. शिवाय या ड्रग्ज प्रकरणात दोन संशयित एका ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते. तेथे त्यांना ड्रग्ज बनवण्याचा अनुभव होता. तरीही त्यांनी सुरुवातीला जे ड्रग्ज तयार केले त्याची चाचणी व्यवस्थित न आल्याने त्याची विल्हेवाट कोठे लावली याचा तपास सुरू असल्याचेही घुगे यांनी सांगितले.
दरम्यान जिल्ह्यात या दोन्ही कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या असून गुन्ह्याला प्रतिबंध होण्यास मदत झाली आहे. या दोन्ही कारवायांमधून तरूण पिढी नशेच्या आहारी जाण्याआधीच पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे. त्यामुळे या दोन्ही कारवायांत सहभागी अधिकारी, अंमलदार यांची महासंचालक पदक तसेच राष्ट्रपती पदक यासाठी निकष तपासून शिफारस करण्यात येण्यार असल्याचेही अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.