घरात घुसून तरुणीवर चाकूचे वार; जिवाच्या आकांताने ती बाहेर पळाली, पाठलाग करून केली हत्या
गोरेगाव (जि. हिंगोली) : तू माझी जिंदगी बरबाद केली, असे म्हणत संजना गजानन खिल्लारी (वय १९) या तरुणीच्या छातीवर व पोटावर चाकूने वार करीत तिला ठार मारल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे घडली.
घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
२० फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास संजना आपल्या राहत्या घरी वरच्या माळ्यावरील खोलीत होती. त्यावेळी आरोपी अभिषेक संजय खिल्लारी याने घराच्या दारावर बसलेल्या तिच्या वडिलांना संजना कुठे आहे, असे विचारत घरामध्ये प्रवेश करत वरील खोलीमध्ये गेला. तू माझी जिंदगी बरबाद केली. तू तुझे आई व काकास परवा दिवसाच्या बद्दल का सांगितले, असे म्हणत आरोपीने संजनावर चाकूचे वार केले. संजना जोराने ओरडत गॅलरीत गेली. तेथेही पाठीमागून येत पुन्हा चाकूचे वार केले. घटनेनंतर आरोपीने तेथून पळ काढला. संजनाचा आरडाओरडा ऐकून तिचे वडील वरच्या खोलीत गेले असता संजना रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजारी ग्रामस्थांच्या मदतीने तिला तत्काळ दुचाकीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
आरोपीला घेतले ताब्यात
घटनास्थळावरून पसार झालेला आरोपी युवक काही वेळात स्वत: पोलिसांच्या स्वाधीन झाल्याची चर्चा होती. याबाबत विचारणा केली असता केंद्रा बु.कडे जाणाऱ्या रस्त्यावरून दुचाकीने पसार होत असताना आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती फौजदार नितेश लेंगुळे यांनी दिली.
रात्री उशिरा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, डीवायएसपी सुरेश दळवे यांनी घटनास्थळाला भेट दिली. शवविच्छेदन व अंत्यसंस्कारानंतर अशोक मारोती खिल्लारी यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात अभिषेक संजय खिल्लारी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके तपास करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.