ई-केवायसी करा, नाहीतर 'या' तारखेनंतर रेशन धान्य होणार बंद
रेशनिंग लाभार्थ्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक असून तसं जर केलं नाही तर धान्य बंद करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा पुरवठा विभागाने एक पत्रक काढत याबाबत स्पष्ट केलं आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. आता रेशन धारक लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पूर्वी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ई-केवायसी न केलेल्या शिधापत्रिकाधारकांना 15 फेब्रुवारी नंतर धान्य दिले जाणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. शिवाय यासंदर्भात सर्व लाभार्थी व रास्त भाव धान्य दुकानदारांना 15 फेब्रुवारी पूर्वी 100 टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यांत एकूण किती लाभार्थी?
रायगड जिल्ह्यात एकूण 17 लाख 68 हजार 262 हे रास्त भाव शिधा लाभार्थी आहेत. त्यापैकी 9 लाख 95 हजार 692 लाभार्थी यांचे ई केवायसी आतापर्यंत पूर्ण झालेली आहेत. तर 7 लाख 72 हजार 570 लाभार्थ्यांचे ई केवायसी बाकी आहेत. या लाभार्थ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.