नागरिकांचा रोष आणि विशिष्ट समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई करताना विशेष काळजी घेण्यात आली होती. अतिक्रमणावरील कारवाईचे फोटो आणि व्हीडीओ देशभरात व्हायरल होऊ नये, म्हणून इंटरनेट सेवा पहाटेपासून बंद ठेवून कारवाई करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त स्वतः मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी थांबून होते.
कुदळवाडी भागात जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने अन्य
मार्गाने वळविण्यात आली होती. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस
आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप
डोईफोडे, स्वप्ना गोरे, विशाल गायकवाड, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस
आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्यासह १०० अधिकारी, ३०० स्थानिक कर्मचारी, राज्य
राखीव दलाचे ३०० जवान असा फौजफाटा शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजल्यापासून
तैनात करण्यात आला होता.
परिसरातील रहिवासी नागरिकांच्या घरावर, कारवाईचा रोष व्यक्त होऊ नये, यासाठी काही सोसायटीच्या गेटवर पोलीस तैनात करण्यात आले होते. अतिक्रमण निर्मूलन विभाग, अग्निशमन विभाग, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आदींसह संबंधित विभागांना महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यरात्री करून, सकाळी सहा वाजता कारवाईसाठी उपस्थित राहण्याबाबत आदेश दिले होते. शुक्रवारी (दि. ७) रात्रीपर्यंत या कारवाईची कुणकुण अन्य कोणाला लागू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
३० जानेवारी रोजी कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी ठराविक पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन रास्ता रोको आंदोलन करीत कारवाईला विरोध केला होता. हे आंदोलन दुसऱ्या दिवशीदेखील सुरू राहिल्याने महानगरपालिकेचे अधिकारी आणि पथक कारवाई न करताच परतले होते. त्यांनतर शनिवारी पहाटेपासून कारवाईचे नियोजन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
कामगारांची गावाकडे परतण्यास सुरुवात
महापालिकेने अतिक्रमण कारवाई करताना येथील लघु उद्योजकांच्या पन्नासहून अधिक छोट्या कारखान्यांवर (शेड) कारवाई केली. काही कोटी रुपयांचे नुकसान या कारवाईमुळे झाले आहे. अनेक कारखान्यांमध्ये वर्कशॉप मध्ये कोट्यवधींची मशिनरी, तयार करण्यात आलेले पार्ट या कारवाईमुळे खराब झाले. १५ ते २० हजार लोकांच्या रोजगारावर या कारवाईचा परिणाम होणार आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक कामगारांनी बॅग भरून गावाकडे परतण्यास सुरुवात केली आहे. अनेकांची मुले या भागात शिक्षण घेत असून, या कारवाईमुळे आता राहायचं कुठं आणि शिक्षण, रोजगार याचे पुढे काय, असा प्रश्न येथील हातावर पोट असणाऱ्यांना पडला आहे. कामगारांमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नागरिकांचादेखील समावेश आहे.
हुकूमशाहीविरुद्ध रस्त्यावर उतरणार
प्रदूषण करणारे, घातक कचरा जाळणारे, अवैध भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र, मागील तीस वर्षांपासून सर्व प्रकारचे टॅक्स भरून लघु उद्योजक व्यवसाय करीत होते. हा परिसर ग्रामपंचायतीमध्ये असताना लोकांनी व्यवसाय सुरू केले होते. लाईट मीटर, पाणी मीटर, अग्निशमन ना हरकत घेऊन हे व्यवसाय सुरू आहेत. महापालिकेत हा भाग समाविष्ट झाल्यावर २०१२ पूर्वीची बांधकामे दंड भरून नियमित करण्यात आली होती. मग आता ३० वर्षांनंतर आम्ही अनधिकृत हा जावईशोध कोणी लावला? आयुक्तांच्या आडून कारवाई कोण करत आहे, हे शहरातील नागरिकांना समजायला हवे. हजारो लोकांचा रोजगार या कारवाईमुळे बुडणार आहे. आम्हाला आता कामगारांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. राजकीय हेतूने प्रेरित कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी लढा देणार आहोत, असे पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.
बांगलादेशी-रोहिंग्यांवर कारवाईच्या नावाखाली स्थानिकांवरच कुऱ्हाड
बांगलादेशी आणि रोहिंगे यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी पक्ष भाजपाने सध्या राज्यात रान उठवले आहे. आम्ही बांगलादेशी मूळ देशी पाठविण्यासाठी रस्त्यावर उतरू असे म्हणत भाजप कार्यकर्ते वेगळेच धार्मिक राजकारण सध्या देशात पेटवित आहेत. परदेशातून भारतात अवैधरित्या राहणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना मूळ देशी पाठविले पाहिजे मात्र हे करताना धार्मिक राजकारणाच्या नावाखाली स्थानिकांवरच कुऱ्हाड चालविण्याचा उद्योग होत असल्याचे सांगून लघु उद्योजक आता भाजपच्या या धोरणावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
पन्नासहून अधिक सामाजिक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
कारवाई करण्यात आलेल्या भागात विशिष्ट समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने राहतात. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधील अन्य समाजाच्या नागरिकांचे व्यवसायदेखील या भागात आहेत. कारवाई करताना विशिष्ट समाजाला टार्गेट केले जात असल्याचा आरोप यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे या समाजासह अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांना सकाळी सहा वाजता त्यांच्या घरी जाऊन त्यांना तेथेच स्थानबद्ध करण्यात आले होते. काही कार्यकर्त्यांना नजीकच्या पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवण्यात आले होते. या सर्व कार्यकर्त्यांचे मोबाईल फोन काढून घेण्यात आले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.