Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरेंनी उठवला आवाज, "दिलेले पैसे परत घेणार असाल तर."

लाडक्या बहिणींसाठी उद्धव ठाकरेंनी उठवला आवाज, "दिलेले पैसे परत घेणार असाल तर."
 

सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे राज्यातील लाखो महिलांना मासिक आर्थिक लाभ देण्यात येत आहे. अशात आता सरकारने या योजनेचे निकष बदण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या योजनेसाठी पाच लाख महिला अपात्र ठरणार आहेत. यानंतर सरकारच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. आज 'शिवबंधन' कार्यअहवाल प्रकाशन सोहळ्यात त्यांनी, “जर अपात्र ठरणाऱ्या पाच लाख महिलांना दिलेले पैसे परत घेणार असाल तर त्यांनी दिलेली मतेही तुम्हाला मिळालेल्या मतांतून वगळणार आहात का?”, असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

जर त्यांना दिलेले पैसे परत घेणार असाल तर…

या कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “आताच येताना मी एक बातमी वाचली. त्यामध्ये पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार असल्याचे समजले. जर लाडक्या बहिणींनी त्यांना विजय मिळवून दिला असेल तर, ही फसवणूक नव्हे तर काय आहे? बहिणींनी त्यांना जाऊन विचारले पाहिजे. तीन तीन भाऊ होते ना, जाकेट भाऊ, दाडी भाऊ, देवा भाऊ.”  ते पुढे म्हणाले की, “आतापर्यंत या योजनेतून पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जर आता त्यांना दिलेले पैसे परत घेणार असाल आणि इथून पुढे लाभ देणार नसाल तर त्यांनी दिलेली मतेही तुम्हाला दिलेल्या मतदानातून वगळणार आहात का? कारण ही तुम्ही फसवून घेतलेली मते आहेत.”


ईडी, इनकम टॅक्स आणि सीबीआय बाजूला ठेवा आणि…
दरम्यान शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) ९ पैकी सहा खासदार फुटणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. यावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. “ते म्हणत आहेत की सहा-सात खासदार फुटणार. पण, हिंम्मत असेल तर फोडून दाखवा. आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत पाहू नका. कारण फोडाफोडी करायला लागलात तर कधी तुमचे डोके फुटेल कळणार नाही. माझे आव्हान आहे, जर फोडाफोडी करायची असेल तर सरकारी यंत्रणा, पोलीस, ईडी, इनकम टॅक्स आणि सीबीआय बाजूला ठेवा आणि हिंम्मत असेल तर एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अपात्र ठरविण्यात आलेल्या निकषांप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या २,३०,००० महिलांना वगळण्यात आले आहे. तसेच वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या १,१०,००० महिलांना योजनेतून अपात्र ठरविले गेले आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या १,६०,००० महिला आहेत. यानुसार एकूण पाच लाख महिला आता अपात्र ठरल्या आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.