Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं; धनंजय मुंडेंच्या काळातील ८७७ कोटींच्या कामांची चौकशी

अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावलं; धनंजय मुंडेंच्या काळातील ८७७ कोटींच्या कामांची चौकशी
 

बीड: संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या व पवनचक्की खंडणी प्रकरणामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबरोबरच तत्कालिन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा मुद्दाही चव्हाट्यावर आला. याच अनुषंगाने पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये झालेल्या ८७७ कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावली. चौकशीत प्रामुख्याने नाविण्यपूर्ण हेडमधून शाळा व अंगणवाड्यांना साहित्य पुरविण्याच्या कामात मोठी अनियमितता समोर आली आहे.

बुधवारी (ता. १२) जिल्हाधिकारी अविनाश पाठक व जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. चिंचाणे यांना पालकमंत्रयांच्या मुंबईच्या कार्यालयात कागदपत्रांसह बोलविण्यात आले आहे. खुद्द अजित पवार आतापर्यंत झालेल्या चौकशीचा आढावा घेणार आहेत. अजित पवार यांनी पालकमंत्रीपद स्विकारल्यानंतर ता. ३० जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक घेताच मागील दोन वर्षांतील निधीच्या वितरणाची चौकशी करण्यासाठी समिति नेमली.

नियोजनच्या माध्यमातून परळीत बोगस कामे करून ७३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या निधी वितरणावर पूर्ण वाल्मिक कराडचा पगडा होता. वाल्मिक कराडच कार्यकारी पालकमंत्री होता, असा आमदार प्रकाश सोळंकेचा आरोप असून मुंडेंनी पालकमंत्रीपद कराडला भाड्याने दिलं होतं, असा धसांचा आरोप आहे.

दरम्यान, धाराशिवचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) संतोष भोर व मुंबईच्या अर्थ व सांख्यिकी विभागाचे अपर संचालक एम. के. भांगे या दोघांची समिती मागील १० दिवसांपासून जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. समितीने या काळातील कामांच्या प्रशासकीय मान्यता, अंदाजपत्रके, देयकांसह अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेटीही दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात नाविण्यपूर्ण योजनेतून शाळा व अंगणवाड्यांना साहित्य पुरवठा कागदोपत्रीच झाल्याचे समोर आले आहे.

तसेच आरोग्य विभागासाठी पुरविण्यात येणारे पोस्टर, बॅनर्सदेखील अशाच पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चौकशीच्या अनुषंगाने उद्या जिल्हाधिकारी अविनाश पाठक व जिल्हा नियोजन अधिकारी श्री. चिंचाणे यांना कागदपत्रांसह बोलावून घेतले आहे. यावेळी चौकशी समितीमधील श्री. भोर व श्री. भांगे यांच्याकडूनही अजित पवार आढावा घेणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.