किल्ले विशाळगडावरील वनखात्याच्या जमिनीवरील अतिक्रमणे तातडीने काढा; मंत्रालयातील बैठकीत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले विशाळगडावर वनखात्याच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे किल्ले विशाळगडाचे पावित्र्य नष्ट होत असून ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत असे आदेश वनविभागाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये दिले.
विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे किल्ले विशाळगडावरील वनखात्याच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावी अशी मागणी केली. या मागणीनंतर वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी हे आदेश दिले. किल्ले विशाळगडावरील झालेली बहुतांश अतिक्रमणे ही वन खात्याच्या जमीनीवर झालेली आहेत. किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे निघाली पाहिजेत, किल्ले विशाळगडाचे पावित्र्य जतन झाले पाहिजे यासाठी विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट ज्या गडावर झाली तो गड पवित्र असला पाहिजे या मागणीसाठी माजी आमदार नितीन शिंदे सातत्याने शासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. काल मंत्रालयामध्ये माजी आमदार नितीन शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत विशाळगडाबाबतीत तातडीने आपण आदेश द्यावेत आणि वनखात्याच्या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासंदर्भात आदेश देण्याची आग्रही मागणी केली. यावेळी वनखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक शौमिता विश्वास यांच्यासह वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये विशाळगडाचे पावित्र्य जतन करण्यासाठी वन खात्याच्या जागेवरील अतिक्रमणे तातडीने वनविभागाने जमीनदोस्त करावीत तसेच किल्ल्यांचे विद्रोपीकरण होणार नाही याची दक्षता वनविभागाने घ्यावी असे आदेश वन मंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाला दिले. तसेच राज्यातील वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणांबाबत वनविभागाने आढावा घ्यावा अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली असता गणेश नाईक यांनी ही मागणी मान्य करत आढावा घेण्याचे आदेश वनविभागाला दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.